विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत. या निवडणुकीची महायुती आणि महाविकास आघाडीसह राज्यातील इतर पक्षांनी जोरदार तयार केली आहे. महायुतीने तर सीट शेअरिंगबाबत प्राथमिक बोलणीही केली आहे. खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तसेच कोणत्या जागांवर अदलाबदली होणार आहे, याची माहितीही अजितदादांनी दिल्याने महायुतीतील आमदारांची चांगलीच डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवार यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीची जागा वाटपाची प्राथमिक चर्चा झाल्याचं सांगितलं. साधारणपणे सिटींग जागा ज्यांना त्यांना राहाव्यात अशी प्राथमिक चर्चा झाली आहे. पण त्यात काही जागांची अदलाबदल होणार आहे. आता एखादा सिटिंग आमदार असेल. पण त्याच्या तुलनेत दुसऱ्या पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार असेल तर ती जागा दुसऱ्या पक्षाने लढवायची, असं आमचं ठरलं आहे. पण ज्या उमेदवाराला ही जागा दिली जाणार आहे, तो तुल्यबळ असावा. त्याची निवडून येण्याची क्षमता असावी हे आम्ही पाहणार आहोत. याबाबतच आमच्या तिन्ही पक्षांचं एकमत झालं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. म्हणजे या निवडणुकीत महायुतीत सिटिंग उमेदवारांची जागा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांना टेन्शन येणार असल्याचं बोललं जात आहे.
अजितदादा यांनी आम्हीही तरुणांना संधी देणार असल्याचं स्पष्ट केलं. आमच्या पक्षात अनेक तरुण आहेत. कितीतरी तरुणांची नावे मी सांगू शकतो. आता आम्ही निर्णय घेताना काही सिटिंग आणि नव्या जागांच्या ठिकाणी नवे चेहरे देणार आहोत. मीही युवाशक्तीला संधी देण्याचं काम करत आहे. मी तरुणपणी खासदार झालो, तेव्हापासून आतापर्यंत मी तरुणांना संधी देत आलो आहे. आताही तुम्ही पाहिलं असेल आम्हाला ज्या जागा मिळाल्या त्यात आम्ही अनिल भाईदास पाटील आणि आदिती तटकरे आदी नवे चेहरे दिले. आम्ही सर्व समाजाला संधी देत आहोत, असं अजितदादांनी स्पष्ट केलं.
वेष बदलून गेल्याच्या चर्चांवरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी जर गप्प बसलो तर लोकांना वाटतं हे बोलत नाहीत. त्यामुळे माझ्या बाबत उठलेल्या वावड्या खऱ्या वाटू लागतात. मध्येच मोठी पेपरबाजी चालली. मी कुठे 10 वेळा अमित शाह यांना भेटलो? आपण लोकशाहीत वावरतो. मला कुठे जायचं म्हटलं तर लपूनछपून जाण्याचं कारण नाही. मी उजळ माथ्याने जाईल. मी स्पष्ट असेल ते बोलतो. पण वेगळ्या प्रकारच्या बातम्या करून त्या दाखवल्या जात आहेत. आम्ही चांगलं काम करतो ते बघवत नाही. आम्ही चांगल्या योजना आणतो ते बघवत नाही. त्यामुळे फेक नरेटिव्ह तयार केला जात आहे. ज्या बातम्या आल्या त्यात तथ्य नाही. मला जायचं असेल तर मी उघडपणे जाईल. मला त्यासाठी कुणाला घाबरण्याचं कारण नाही, असंही ते म्हणाले.
माझं संसदेला आव्हान आहे. पाहावं आणि तपासावं. मी जर वेश बदलून गेल्याच्या आरोपात तथ्य असेल तर मी राजकारणातून बाहेर जाईल. खरं नसेल तर, कोणतीही माहिती नसताना ज्यांनी माझ्यावर आरोप केल्याने त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा, असं आव्हानच त्यांनी दिलं.