उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी देखील भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. अजित पवार यांनी भल्या पहाटे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हाट्सअप स्टेटस ठेवलं होतं. पार्टी अँड फॅमिली स्प्लिट, असं त्या स्टेटसमध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. यानंतर आता खरंच तशी परिस्थिती निर्माण झालीय का? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. अजित पवारांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी अजित पवारांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी अजित पवारांनी विविध प्रश्नांवर रोखठोक उत्तरे दिली.
पहाटेच्या शपथविधीवेळी सुप्रिया सुळेंचं ट्विट होतं पार्टी अँड फॅमिली स्प्लिट… ते आता झालंय का? असं अजित पवारांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी “ज्यांनी कोणी ट्विट केलं. त्यांना विचारा ना. मला कशाला विचारता. बाकीच्यांच्या गोष्टींवर बोलायला मी बांधिल नाही. माझ्या स्टेटमेंटवर मी बोलायला बांधिल आहे. बाकीच्यांनी काय बोलावं सदविवेकबुद्धीला स्मरून तो त्यांचा अधिकार आहे”, अशी प्रतिक्रिया दिली. “मी तसं म्हटलं का? ज्यांनी म्हटलंय त्यांना विचारा”, असंही अजित पवार म्हणाले.
“आमच्या इथं ६२ साली अख्खं कुटुंब एका साईड होतं आणि एकटे पवार साहेब काँग्रेसकडे होते. बाकी सगळे शेकापकडे होते. आमच्या कुटुंबाला नवं नाही. विशेष नाही. तुम्ही म्हणता एकटं पडलं, ज्यांचा राजकारणाचा संबंध नाही. ते बाजूला आहे. आम्हाला दोघं सारखे आहेत असं म्हणत आहेत. आमच्या अनेक बहिणी म्हणतात आम्हाला दोघे सारखे. आमचं कुटुंब मोठं आहे. काहींनी सांगितलं उमेदवार बदलला असता तर आम्ही संपूर्ण कुटुंबाने तुमचं काम केलं असतं. यातून त्यांच्या मनात काय आहे माहीत नाही. त्याच्या खोलात मी जात नाही. त्यांचा अधिकार आहे. कुणी कुणाचा प्रचार करावा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
“चार पाच वर्ष महाराष्ट्रातील जनतेला कळेल. चार पाच वर्षात. कुणाकडे सुत्रे राहतील. त्यात विशेष काय. ताम्रपट घेऊन कोणी जन्माला आलं नाही. जनता ज्याच्या पाठी त्याला संधी मिळेल. ठरावीक काळ झाल्यावर थांबलं पाहिजे. पण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रात तुम्ही कधी तरी थांबतना . वकील, खेळाडू, डॉक्टरही थांबतात. पण कुणी कुठे थांबावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आम्ही त्यावर बोलू शकत नाही”, असं उत्तर अजित पवारांनी दिलं.
“आपण काहीही ठरवलं तर आपल्याकडे देशात आणि महाराष्ट्रात अनेक उदाहरण आहे. पक्ष काढल्यानंतर त्याची भूमिका पुढे कुणी काय घ्यावी ते पक्षाचे कार्यकारिणी सदस्य, कार्यकर्ते, खासदार आणि आमदार घेत असतात”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.