पुणेः बारामतीत कुणीही येऊ द्या. त्यांचं स्वागतच आहे. पण मतदानाच्या दिवशी काय करायचं, कुठं बटण दाबायचं हे बारामतीकरांना (Baramati) चांगलंच माहिती आहे, असं अजित पवारांनी (Ajit Pawar) निक्षून सांगितलं. साहजितच त्यांचा निशाणा भाजपकडे आहे. भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बारामतीत जाऊन इथे भाजपाचाच विजय होणार, अशी घोषणा केल्यानंतर सर्वत्र चर्चेला उधाण आलंय. शरद पवार कुटुंबियांची पकड असलेल्या बारामतीतच थेट भाजपने बदलाची गर्जना केल्यानंतर अवघ्या देशाचं लक्ष या मतदारसंघावर खिळलंय. पण माध्यमांसमोर अजित पवारांनी रोखठोक मत मांडलं. असे किती आले आणि किती गेले. तुम्ही बारामतीची काळजी करू नका, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं.
अजित पवार म्हणाले, ‘ तुम्ही बारामतीची काळजी करू नका. माझ्यापेक्षा जास्त कुणी बारामतीत काम करत असेल तर त्याचा विचार करता येईल. कावळ्याच्या शापाने जनावरं मरत नसतात. ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येकजण नवीन अध्यक्ष झाल्यावर हुरूप येतो..
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे फक्त प्रसिद्धीसाठी बारामतीला आले, असा टोला अजित पवारांनी लगावला. ते म्हणाले, ‘ भाजपचे प्रांत अध्यक्ष यांची नव्याने नियुक्ती झालीय. त्यांना हुरूप आला. बारामतीला आले नसते तर एवढी प्रसिद्धी मिळाली नसती. ते इथे आले म्हणून प्रसिद्धी मिळाली….
‘मी त्यांना विचारतो, तुम्ही एवढे पक्षाच्या जवळचे होता तर तुम्हाला 2019 ला तुम्हाला, पत्नीला उमेदवारी का नाकारली, याचं उत्तर द्या…. ही त्यांची पक्षांतर्गत गोष्ट आहे. पण माझं मत आहे की, कुणीही इथे यावं. सर्वांचं स्वागतच आहे. पण मतदानाच्या दिवशी कुठं बटण दाबायचं हे बारामतीकरांना चांगलंच माहिती आहे. ‘
त्या देशद्रोही माणसाबद्दल हे ज्यांनी केलं असेल त्याची चौकशी करावी. केंद्राच्या, राज्याच्या एजन्सींनी करावी. जो दोषी असावी, त्यावर कारवाई करावी. महाराष्ट्रात अशा घडताना मूक संमती जे देत असतील, त्यावर कारवाई झाली पाहिजे.