मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मातब्बर नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप आणि इतर पक्षांत प्रवेश केला होता. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी खेद व्यक्त केला (Deputy Chief Minister Ajit Pawar). आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आज मुंबईत ‘मिशन मुंबई 2022’ या शिबिरचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना अनेक सूचना दिल्या.
“सत्तेत आल्यावर पक्षात हवशे नवशे येतात. मात्र, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि नरेंद्र वर्मा सोडून आपल्याला जे सोडून गेले त्यांचा आपल्याला काही उपयोग नाही. सचिन अहिर, प्रसाद लाड, चित्रा वाघ, संजय पाटील यांना सगळं दिलं तरी निघून गेले. सुभाष मयेकर अध्यक्षपद होतं तोपर्यंत आपल्यासोबत होते मात्र आता कुठे गेले माहित नाही. सरकार आले म्हणून चिकटायला आले तर त्यांना जवळ करु नका. यापुढे अशा लोकांना 2 वर्ष थांबायला सांगा ते खरंच पक्षासोबत आहेत का पाहा मग त्यांना जवळ करा”, असा सल्ला अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी कार्यकर्त्यांना दिला.
“राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचं सरकार आहे. मुंबईतदेखील ताकद वाढली पाहिजे. कारण लोकांच्या अपेक्षा जास्त आहेत. आम्ही शपथ घेऊन बरोबर 2 महिने आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर सहा कॅबिनेट मंत्र्यांची शपथ घेऊन 3 महिने झाले आहेत. भाजपने अनेक चुकीचे निर्णय घेतले होते ते पूर्ववत करीत आहोत. आपण कोणतीही विकासकामं थांबविली नाहीत. जिथं शंका येत आहे, कुठेतरी पाणी मुरतंय असं वाटतंय तिथे आपण काम थांबविली आहेत”, असं अजित पवार यांनी सांगितलं.
“शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे. मात्र, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेलासोबत घेण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. शिवसेना मुंबई महापालिकामध्ये 1 नंबरचा पक्ष आहे. त्यांनी 1 नंबरवरच राहावं पण राष्ट्रवादी २ नंबरवर असायलाच हवी”, असं अजित पवार कार्यककर्त्यांना उद्देशून म्हणाले.
“मुंबईत 36 पैकी 10 आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले पाहिजेत. मुंबईत केवळ 8 नगरसेवक आहेत. यापुढे 50 ते 60 जागांवर विजय मिळाला पाहिजे. काम करताना तुमच्याजवळ असलेल्या पदाचा उपयोग समाजोपयोगी कामांसाठी करा. पक्षाची बदनामी आणि पवार साहेबांची बदनामी होऊ देऊ नका”, अशी सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली.
दोन वर्षांत मुंबई महानगरपालिका निवडणूक येत आहे. मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपलं सरकार तत्पर आहे. किमान १० आमदार आणि महानगरपालिकेत ५० ते ६० नगरसेवक निवडून आले पाहिजेत, तशा पद्धतीनं कामाला लागा, असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं. pic.twitter.com/jyU4xysHHu
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 1, 2020
महापालिका स्तरावर पक्ष मजबूत व्हायला हवा होता : प्रफुल्ल पटेल
“पक्षस्तरीय पातळीवर मुंबईत आपलं लक्ष कमी पडलं. महापालिका स्तरावर पक्ष मजबूत व्हायला हवा होता. पवार साहेबांचं वय वाढत आहे तशी त्यांची कार्यक्षमता आणि लोकप्रियता वाढत आहे. राष्ट्रवादी ग्रामीण भागात नाळ जोडलेला पक्ष आहे. मात्र, शहरात राहणाऱ्या लोकांचे प्रश्न सोडविण्यास आपण कमी पडतोय हे आपण स्वीकारलं पाहिजे”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
मुंबईत संघटना मजबूत होणं आवश्यक : आदिती तटकरे
सत्तेत आल्यावर आपण निवडून येऊच, अशी मानसिकता लोकांची होते. मात्र, तसं करु नये. संघटना बांधणीला महत्त्व द्यायला हवं. मुंबईत संघटना मजबूत होणं आवश्यक आहे, असं राष्ट्रवादीच्या नेत्या आणि उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.
मुबंई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक दिवशीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks व राष्ट्रीय सरचिटणीस खा. @praful_patel यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शिबिरासाठी ज्येष्ठ नेत्यांसह, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपलब्ध होते. pic.twitter.com/Eye7F9vGJF
— NCP (@NCPspeaks) March 1, 2020
हेही वाचा : …पण आता ठाकरे सगळंच घेताहेत, ‘सामना’ संपादक पदावरुन चंद्रकांत पाटलांचा टोला