मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन ठरावावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जोरदार भाषण केलं. अजित पवार (ajit pawar) यांनी आपल्या स्टाईलमध्ये भाषण करत शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना चिमटे काढले. एवढेच नव्हे तर बंडखोर आमदारांनाही टोले लगावले. शिवसेना नेमकी काय आहे हे सांगतानाच बंडखोर करणारे पुन्हा कधीच निवडून येत नाहीत. हा शिवसेनेचा (shivsena) इतिहास आहे. शिवसैनिक नेहमीच ठाकरे कुटुंबाच्या पाठी राहिली आहे, असं सांगतानाच त्यांनी छगन भुजबळ, नारायण राणे यांची उदाहरणे देत बंडखोरांना घाबरवून सोडले. यावेळी त्यांनी काय डोंगार, काय झाडी, काय हाटील म्हणणाऱ्या सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनाही सुनावले. आपण एकाचवेळी निवडून आलो. पाच पाच लाख लोकांचं आपण नेतृत्व करतो, असं सांगत गोव्यात नाचणाऱ्या आमदारांनाही अजितदादांनी फटकारलं.
सुरतवरून गुवाहाटी मग गोवा, असा आमदारांचा प्रवास झाला. माझ्या माहितीप्रमाणे इतक्या 10-12 दिवसात आतापर्यंतच्या हयातीत आमदारांना इतकं सगळं फिरायला मिळालं नसेल. कुटुंबासोबत ते फिरले असतीलही. पण आमदारांसोबत फिरले नसतील. मग आमचे शहाजीबापू.. काय झाडी… काय डोंगार… काय हॉटील.. वोक्के वोक्के… यात फार गोंधळून जाण्याची आणि फार लगेच वक्तव्य करण्याचं कारण नाही, असा चिमटा अजित पवार यांनी काढला.
तुम्ही फार हुरळून जाऊ नका. ही मोठी लोकं कधी एकत्र येतील, यांचा काही नेम नाही. शिंदेसाहेब यांचं अभिनंदन करतो. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यावर हॉटेलात काही जणांनी नाच केला. नंतर टेबलावरच नाचायला लागले. सत्ता येते, जाते, आपण पाच पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. याचं भान ठेवा, अशा शब्दात त्यांनी आमदारांना फटकारलं.
यावेळी त्यांनी दीपक केसरकर यांचाही उल्लेख केला. गोव्यात आमदार नाचले. त्यामुळे प्रवक्ते म्हणून तुम्ही दिलगिरी व्यक्त केली. कारण तुमच्यावर राष्ट्रवादीचे संस्कार झालेलेत. अब्दुल सत्ताही शांत आहेत. त्यांनी एवढ्या काळात एकदाच भाष्य केलं. बिर्याणी खायला जातोय असं ते म्हणाले. पण नंतर त्यांची बिर्याणी दिसली नाही. मंत्रिमंडळ स्थिरस्थावर होत नाही, तोपर्यंत शांत बसायची सत्तार यांनी भूमिका घेतल्याचं दिसतंय, असा चिमटा त्यांनी काढला.
शिवसेनेच्या नेत्याबरोबर शिवसैनिक जात नाही, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. येणाऱ्या निवडणुकीत काय ते स्पष्ट होईल, असं सांगतानाच छगन भुजबळ यांच्या बरोबर 17-18 आमदार फुटले होते. पण नंतर ते निवडून आले नाहीत. नारायण राणेंबरोबरचे आमदारही जिंकले नाहीत. यावरून शिवसैनिक नेहमीच ठाकरे कुटुंबाच्या पाठी असल्याचं दिसून येतं, असं अजितदादांनी गुलाबराव पाटील यांचं नाव घेऊन सांगितलं.