मुंबई : काँग्रेसने नाशिक पदवीधर मतदारसंघातील (Nashik Graduate Constituency Election)दोन्ही उमेदवारांवर कारवाई केल्याने आघाडीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा निर्माण झाली आहे. दरम्यान अपक्ष महिला उमेदवार शुभांगी पाटील यांनी उध्दव ठाकरे आणि माझ्याशी संपर्क साधला आहे. यावर द्या अंतिम निर्णय होईल अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना महत्वाची माहिती दिली.
काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली असताना अर्ज दाखल न केल्यामुळे नाशिक पदवीधर विधान परिषद मतदारसंघामध्ये (Nashik MLC Election)पेच निर्माण झाला आहे. आघाडी म्हणून जागा वाटप करताना औरंगाबाद (विक्रम काळे) ही जागा राष्ट्रवादीकडे तर नाशिक कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांनी अर्ज भरला नाही. हा अर्ज न भरण्यामागे काय कारण आहे हे फक्त डॉ. सुधीर तांबेच सांगू शकतील असेही अजित पवार यांनी सांगितले.
गडबडीची कुणकुण होतीच
तीन टर्म आमदार असल्याने या जागा वाटपावर चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीतील नेते एकमेकांशी चर्चा करत होते. आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशीही चर्चा झाली होती. आताही ते सतत फोनव्दारे संपर्कात आहेत. मात्र नाशिक येथे काहीतरी गडबड आहे याची कुणकुण लागली होती आणि याची कल्पना कॉंग्रेसच्या वरीष्ठांना दिली होती असेही अजित पवार यांनी सांगितले. या जागा वाटपावर भाजप बोलत आहे. भाजपला संधी मिळाली आहे म्हणून बोलत आहेत मात्र त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. आम्ही बसून योग्य तो मार्ग काढला होता मात्र अर्ज न भरल्याने प्रश्न निर्माण झाला आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
तिन्ही पक्षाचा निर्णय
हा काँग्रेस अंतर्गत प्रश्न आहे त्यात महाविकास आघाडीला गोवण्यात काही अर्थ नाही, असे म्हणण्यात अर्थ नाही. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून निर्णय घेतला होता त्याला मी साक्षीदार आहे असे सांगतानाच त्यामुळे महाविकास आघाडीत मन्वय नव्हता हे मी मान्य करणार नाही असे अजित पवार यांनी सांगितले.
दावोसमधून निधी आणावा
दावोसला गेले आहेत तर जास्तीत जास्त निधी आणावा व आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करावे कारण काही लाख कोटी रुपये गुंतवणूक असणारे प्रकल्प बाहेर जाऊ देणे आणि काही लाख तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवले हे घडलेले हे त्रिवार सत्य असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट करतानाच ४५ हजार कोटींचा करार होणे आणि प्रत्यक्षात गुंतवणूक होणे हे पहावे लागणार आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी गुंतवणूक येणार असेल तर आम्हाला आनंद आहे आणि त्याचे स्वागतच करु असे स्पष्टच सांगितले.
हिंदी राष्ट्रभाषा व्हावी
हिंदी राष्ट्रभाषेविषयी देशपातळीवर चर्चा झाली होती. आपण बोलत असताना जागतिक भाषा म्हणून इंग्रजीचा तर राष्ट्रीय भाषा म्हणून हिंदी आणि मातृभाषा म्हणून मराठी भाषेचा उल्लेख करतो. पण मराठी – इंग्रजीबद्दल दूमत असण्याचे कारण नाही. या दोन्ही भाषा मोठ्याप्रमाणावर बोलल्या जातात. मात्र राष्ट्रभाषेबद्दल तशाप्रकारे केंद्रसरकारने हिंदी राष्ट्रभाषा जाहीर केलेली नाही. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांची याबाबत वेगळी भूमिका आहे. परंतु महाराष्ट्राचा नागरीक या नात्याने विचारले तर हिंदी राष्ट्रभाषा करायला हरकत नाही तसा केंद्रसरकारने प्रयत्न करावा अशी मागणीही अजित पवार यांनी केली.
आदित्य ठाकरेंच्या तक्रीत तथ्य
आदित्य ठाकरे यांनी मुंबई मनपातील रस्ता गैरप्रकारांबाबत ज्या बर्याच गोष्टी सांगितल्या त्यात शंभर टक्के तथ्य आहे. मुंबईवर प्रशासक आहे. प्रशासक व नगरविकास खात्याची वस्तुस्थिती काय आहे याचे महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. यावर आयुक्त आणि त्यांच्या टीमचे काय म्हणणे आहे हे राज्याला व मुंबईकरांना कळले पाहिजे अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी केली.
प्रकाश आंबेडकर शंका का घेतात
प्रकाश आंबेडकर हे आमच्या पक्षावर सतत का शंका घेतात हे कळायला मार्ग नाही. शरद पवार यांनी ओपनमधून प्रकाश आंबेडकर, रा. सू. गवई, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे यांना निवडून आणण्याचे काम केले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत आठवले यांच्यासोबत युती राहिली होती. पंढरपूरमधून आठवले यांना निवडून आणले होते. प्रकाश आंबेडकर नेहमीच आमच्या पक्षाच्या वरीष्ठांवर अशाप्रकारची वक्तव्य करत असतात तो त्यांचा अधिकार आहे परंतु आम्ही कुणाशीही तसे वागत नाही हे प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपावर अजित पवार यांनी स्पष्ट केले.