मुंबई: राज्यातील शिंदे सरकारने सत्तेत येताच इंधनावरील व्हॅट (VAT on fuel) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी टोला लगावला आहे. मी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी मी कोणतीही करवाढ केली नव्हती. दोन वर्ष कोरोनात (corona) गेले. त्यामुळे विकास कामावर परिणाम होऊ नये म्हणून आम्हाला इंधनावरील व्हॅट कमी करता आला नाही. दीड लाख कोटी पगार आणि पेन्शनवर जातात. व्हॅट कमी केला नसता तर काही हजार कोटींचा फटका बसला असता. मधल्या काळात शेतकऱ्यांचे निर्णय घेतले. त्याला कुठे अडचण येऊ नये म्हणून खबरदारी घेतली होती. पण नवीन सरकार आल्याने तुमच्यासाठी काही तरी निर्णय घेतला हे दाखवण्यासाठीच शिंदे सरकारने व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला असावा. काही तरी बदल झाला दाखवण्यासाठी हा निर्णय घेतला असावा, असा टोला अजित पवार यांनी लगावला.
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना अजित पवार बोलत होते. त्या काळात गॅसवरचा टॅक्स आम्ही कमी केला. हा टॅक्स साडे तेरा टक्के होता. तो तीन टक्क्यांवर आणला. त्यामुळे हजार कोटींचा भार आला होता. कार, रिक्षा आणि गृहिणींना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला होता. इंधनावरील व्हॅट कमी करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद मोदींना सर्वांना केलं होतं. मी अर्थसंकल्प सादर करताना कोणताही कर वाढवला नव्हता. कोरोनाची दोन वर्ष कशी गेली तेही आपण पाहिलं. गेल्या वेळेपेक्षा यंदा जीएसटीचं उत्पन्न चांगलं आलं आहे. मी विचारलं, पेट्रोल आणि डिझेलवरचे किती पैसे कमी करणार आहात. त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेणार असल्याचं सरकारकडून सांगितलं गेलं, असं अजित पवार यांनी सांगितलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या सरकारच्या निर्णयांचा फेरविचार करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सरकार बदलल्यावर, नवीन सरकार आल्यावर मागच्या महिन्यातील निर्णयावर विचार केला जातो. शिंदे हेच आमच्या मंत्रिमंडळात होते. त्यांच्याच उपस्थित निर्णय झाले होते. ते आता भाजपसोबत आहेत. त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा अधिकार आहे. पण त्यांनी राज्याच्या भल्याचे निर्णय पुढे नेऊ, कॅबिनेट घेऊन त्या निर्णयावर शिक्कामोर्तब करू असं म्हटलं आहे, असं अजितदादांनी सांगितलं.
शिवसेनेने सांगितलं 25 वर्ष युती केली ती सडली. ज्यावेळी तुम्ही तुमच्या राजकीय भूमिका बदलता. तेव्हा मागच्या भूमिकांचं समर्थन करत नाही. त्यामुळे नवीन भूमिका सांगून समर्थन करत असतात. राजकारणात कोणी कोणाचा मित्रं नसतो. 2014मध्ये सेनेला किती खाती दिली होती ते पाहिलं. शिंदे तेव्हा म्हणायचे माझ्या खिशात राजीनामा आहे. आम्ही राजीनामा घेऊन फिरतो असं तेव्हा शिवसेनेचे मंत्री म्हणायचे. ते आमच्याकडे आले तेव्हा त्यांचं भाषण बदललं. इतर ठिकाणी गेल्यावर अजून बदलतात. त्यामुळे त्यावर लक्ष देण्याची गरज नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.
आमची संख्या 53 असल्याने विरोधी पक्षनेतेपद आमच्याकडेच येणार होतं. आमच्या नेत्यांनी चर्चा करून मला पद दिलं. मी 32 वर्ष विधिमंडळात काम केलं. कधी राज्यमंत्री, कधी मंत्री, कधी उपमुख्यमंत्री असं काम केलं. आताची जबाबदारी वेगळी आहे. लोकशाहीत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्याची जबाबदारीही वेगळी असते. महाराष्ट्रात वेगवेगळे प्रश्न आहेत. त्यावर आम्ही आवाज उठवू. आपल्या राजकारणात विरोधी पक्ष नेत्यांची मोठी परंपरा आहे. अनेक मान्यवरांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवलं आहे. माझ्यावर जास्तीची जबाबदारी आहे. ती चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न राहील. वेगवेगळ्या आयुधांचा वापर करू. जिथं योग्य काम असेल तिथे सकारात्मक भूमिका घेऊ. जिथे चुकीचं काम असेल तिथे सभागृहात आणि बाहेरही विरोध करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.