मुंबई : राज्यात शिंदे आणि फडणवीसांच्या नेतृत्वात नवं सरकार सत्तेत येऊन 20 दिवस उलटून गेली. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होऊ शकलेला नाही. विस्ताराबाबत रोज नव्या तारखा समोर येत आहेत. तर मंत्रिमंडळ विस्तारात कुठलीही अडचण नाही. लवकरच विस्तार होईल असं शिंदे-फडणवीस सांगत आहेत. त्यासाठी शिंदे आणि फडणवीसांचे दिल्ली दौरे सुरु असल्याचंही पाहायला मिळत आहे. दुसरीकडे राज्यात काही भागात अतिवृष्टीमुळं शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालं आहे. अशावेळी तातडीनं अधिवेशन घ्या, अतिवृष्टी झालेल्या भागात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसह त्यांना बियाणे, रोपं सरकारमार्फत द्या, अशी आक्रमक मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलीय. अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) जोरदार हल्ला चढवला.
तुमच्याकडे बहुमत असल्याचा दावा करत आहात. मग अधिवेशन घेण्यापासून तुम्हाला कुणी रोखलं आहे? मंत्रिमंडळ विस्तार करण्यापासून तुम्हाला कुणी रोखलं? असे सवाल अजित पवारांनी शिंदे आणि फडणवीसांना केलाय. विरोधी पक्ष नेता या नात्यानं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. विदर्भ, मराठवाडा आणि राज्यात अतिवृष्टी झालेल्या भागात ओला दुष्काळ जाहीर करा. आज सगळी धरणं भरली आहे. अनेक धरणं ओव्हर फ्लो होतील अशी भीती आहे. काही ओव्हर फ्लो झाली आहेत. एक गोष्ट चांगली झाली चिपळून, महाड भागात यंदा पुराचं संकट आलं नाही. आम्ही आमच्या तिथल्या लोकप्रतिनिधीमार्फत नदीतील गाळ काढला होता. राहिलेला गाळ पावसाळ्यानंतर काढण्याची मागणी आम्ही सरकारकडे करणार आहोत. मी काही भागात पाहणी केली आहे. अजून काही भागात मी आणि आमचे नेते पाहणी करतील, अशी माहितीही अजितदादांनी दिलीय.