मुंबई: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आलं आहे. विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागताच अजित पवार (Ajit Pawar) हे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. राज्यात प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील काही भागात महापूर (flood) आला आहे. त्यामुळे अनेक लोकांना बेघर व्हावं लागलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. तसेच आपण लवकरच राज्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहोत, असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. पूर्वी विरोधी पक्षनेतेपदी असताना देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली होती. आता अजित पवार विरोधी पक्षनेते झाले असून त्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करण्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे अजित पवार आता फडणवीसांच्या भूमिकेत आल्याची चर्चा होत आहे. विरोधक सत्तेत आल्यावर पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांसारखे वागतात. आणि विरोधात गेल्यावर पूर्वीच्या विरोधकांसारखे वागतात. त्यात काही नवीन नाही, अशी चर्चाही आता रंगू लागली आहे.
अजित पवार यांना पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. सततच्या पावसामुळे शेतपिके वाहुन गेली असून शेतीसाठी वापरण्यात आलेली बियाणे, खते यांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे अद्यापपर्यंत पंचनामे होऊ शकले नाहीत. शहरी भागातील तसेच विशेषत: ग्रामीण भागातील रस्ते अतिवृष्टीमुळे वाहुन गेले आहेत. अतिवृष्टीमुळे विशेषकरुन ग्रामीण भागात वीजवितरण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे महावितरण, महापारेषण व एकंदरीत ऊर्जा विभागामार्फंत तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. या परिस्थितीमुळे दुर्देवाने शेतकरी आत्महत्या करीत आहेत, असं अजित पवार म्हणाले.
राज्यातील काही भागांमध्ये मी स्वत: पाहणी केली असून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याशी सातत्याने दूरध्वनीद्वारे संपर्कात आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांने केलेल्या पेरण्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पावसाने जमिनी वाहुन गेल्या असून घराचीही मोठया प्रमाणावर पडझड झाली आहे. स्थावर मालमत्तेचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे पंचनामे अजूनपर्यंत होऊ शकले नाहीत. पूर्वीच या दोन्ही विभागामध्ये शेतकरी अडचणीत असताना मोठया प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होण्याचे प्रमाण निदर्शनास आले आहे, असं त्यांनी सांगितलं.
मंत्रिमंडळ स्थापन न झाल्यामुळे पालकमंत्री जी जबाबदारी संभाळत असतात तेथेसुध्दा आज पालकमंत्री नसल्याने या यंत्रणेला दिशा देण्याचे काम होऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये पूर्वीच्या शासनाने 18 जुलैला पावसाळी अधिवेशन घेण्याचे निश्चित केले होते. पंरत राज्यातील राजकीय घडामोडीमुळे अनिश्चित काळासाठी अधिवेशन पुढे गेले आहे. विविध माध्यमामध्ये वेगवेगळया तारखा जाहीर केल्या जात असून अधिवेशन कधी होईल याची निश्चित: नाही. त्यामुळे लवकरात लवकर अधिवेशन घेण्यात यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.