पुणे : आगामी महापालिका निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक आपल्याच नेतृत्वात लढली जाणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. इतकंच नाही तर पुण्यातील काही भाजप नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावाही अजित पवार यांनी केला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या या वक्तव्यानं पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. (Ajit Pawar’s big statement on Pune, Pimpri-Chinchwad Municipal Corporation Election )
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढली जामार आहे. पुण्यातील काही नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. मात्र, मी खालच्या पातळीचं राजकारण करत नाही. भाजपच्या अनेक नगरसेवकांना आम्ही संधी दिली आहे, असं अजित पवार म्हणाले. पालिका हाती असल्यास चांगलं काम होतं, असंही अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत केलेल्या संकेताबाबत पत्रकारांनी अजित पवार यांना विचारलं. त्यावेळी आम्ही एकत्र काम करत असताना आजपर्यंत तरी चांगलं सुरु आहे. त्यामुळे या वक्तव्याकडे फारसं गांभीर्यानं पाहत नाही. ते राज्याचे प्रमुख आहेत, ते बोलू शकतात, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, विकासाचं व्हिजन डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही अनेक वर्ष पिंपर-चिंचवडमध्ये कामं केली. मात्र 2013-14 मध्ये नरेंद्र मोदींची देशभरात हवा होती. त्यामुळे चांगलं काम करुनही आम्हाला विरोधात बसावं लागलं. परंतु आता भाजपमधील अनेक नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. मी त्यांना सांगतो, की ज्यांना यायचं आहे त्यांनी डिस्क्वालिफाय (अपात्र) झालं नाही पाहिजे. ते निवडणुकीसाठी अपात्र ठरले तर पुढील 6 वर्ष ते निवडणूक लढू शकणार नाहीत. आत्ता जे आले आहेत ते अपक्ष आहेत, किंवा असे काही जण संपर्कात आहेत, ज्यांचे पती नगरसेवक आहेत, किंवा पत्नी नगरसेविका आहे तर तिचे पती पक्षाच्या संपर्कात आहेत.
गणेशोत्सव काळात पुण्यात जमावबंदी किंवा संचारबंदी लागू करण्यात आली नव्हती. मात्र, अनंत चतुर्दशीला (Anant Chaturdashi) म्हणजे गणपती विसर्जनादिवशी (Ganesh Visarjan) पुण्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. अनंत चतुर्दशीला पुण्यात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा अजित पवार आणि पुणे प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.
राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात गणपती विसर्जना दिवशी निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गणेश विसर्जनाला पुणेकर मोठ्या संख्येनं घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात सर्व दुकाने बंद करुन निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इतर बातम्या :
पेट्रोल, डिझेल जीएसटीमध्ये आणण्यास विरोध करणाऱ्या आघाडी सरकारचा ढोंगीपणा उघड, भाजपचं टीकास्त्र
अनंत चतुर्दशीला पुणे बंद! फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार, अजित पवारांकडून स्पष्ट
Ajit Pawar’s big statement on Pune, Pimpri-Chinchwad Municipal Corporation Election