मुंबई : लोकसभा निवडणुकीला अवघं वर्ष उरलं आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकांचा आढावा घेतला जात आहे. महाविकास आघाडीत तर लोकसभा निवडणुकीच्या अनुंषंगाने बैठकाही झाल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आमचे 19 खासदार होते. पुढच्यावेळीही संसदेत 19 खासदार दिसतील असा विश्वास व्यक्त केला आहे. शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यानंतर अनेक पक्षातील नेत्यांचं झालेलं पक्षांतर या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीत तगडे उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमदारांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचं सर्वच राजकीय पक्षात घटत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे. विजयाची खात्री असणाऱ्या उमेदवारांची शोधाशोध या राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. त्यामुळेच आमदारांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. आमदारांचे मन वळवण्याचे पक्षाच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. तरुण आणि लोकप्रिय आमदारांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याकडे सर्वच राजकीय पक्षांचा कल दिसत आहे.
भाजप : रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन
शिवसेना UBT : सुनील प्रभू, विशाखा राऊत
राष्ट्रवादी काँग्रेस : अदिती तटकरे
शिवसेना ( शिंदे गट) : दीपक केसरकर
एकीकडे संजय राऊत यांनी आमचे संसदेत 19 खासदार किंवा त्याहून अधिक खासदार दिसणार असल्याचा दावा केला आहे. त्यावर शिंदे गटाने ठाकरे गटाच्या खासदारांची संख्या कमी आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडीत 19 जागा कशा काय मागू शकतात? असा सवाल केला आहे. मात्र, दुसरीकडे हाच शिंदे गट भाजपकडे लोकसभेच्या 22 जागांवर दावा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
शिवसेनेचे 22 खासदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे तेवढ्या जागा आम्हाला सोडाव्यात असा शिंदे गटाचं म्हणणं असल्याचं सांगितलं जात आहे. ठाकरे गटानं लढलेल्या 23 पैकी 22 जागांवर लढण्याची तयारी शिंदे गटाने सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. लोकसभेसाठी शिंदे गटाचं मिशन-22 हाती घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही लोकसभेच्या 22 जागांसाठी आग्रही असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.