मुंबई : शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराला (Cabinet Expansion) महिना लागला. विस्तारानंतर पाच दिवसांनी खातेवाटप जाहीर झालं. त्यानंतर आता अखेर मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करण्यात आलं आहे. विस्तार आणि खातेवाटपाला वेळ लागल्यानं विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) जोरदार टीका केली होती. तर सत्ताधाऱ्यांकडूनही विरोधकांना उत्तरं देण्यात येत होती. त्यानंतर आज मंत्र्यांना बंगल्याचं (Ministers Bungalow) वाटप करण्यात आलं आहे. सत्तांतरानंतर काही माजी मंत्र्यांनी बंगले रिकामे केले नव्हते. त्यामुळे नव्या मंत्र्यांना बंगले देण्यात अडचणी येत होत्या. अखेर अनेक बंगले रिकामे झाल्यानंतर नवनिर्वाचित मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करण्यात आलं आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील 9 तर भाजपच्या 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या 18 मंत्र्यांमध्ये एकाही महिला आमदाराला स्थान मिळालं नाही. त्यावरुन विरोधकांसह स्वपक्षातील महिला नेत्यांकडूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा झाली. त्यानंतर अखेर शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात महिलांना स्थान मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय. मिळालेल्या माहितीनुसार दोन महिला आमदारांना मंत्रिपद दिलं जाणार आहेत. त्यात एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्रीपद दिलं जाणार असल्याची चर्चा आहे.
देवयानी फरांदे, माधुरी मिसाळ या दोन नावांची जोरदार चर्चा आहे. देवयानी फरांदे या नाशिकच्या आमदार आहेत. तर माधुरी मिसाळ या पुण्याच्या आहेत. तर मनिषा चौधरी आणि सीमा हिरे या दोघींचीही नावं चर्चेत आहेत. मनिषा हिरे या नाशिकच्या आहेत. विशेष म्हणजे या चारही महिला नेत्या या भाजपच्या आहेत.