संजय सरोदे, औरंगाबाद: आम्ही उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) भेटायला जायचो तेव्हा ते मास्क लावूनच असत. त्यांचा मास्क कधी उतर नव्हता. सरकार गेलं आणि त्यांचा मास्क गेला. खुर्ची बरोबर कोरोनाही गेला, अशा शब्दात पालकमंत्री संदीपान भुमरे (sandipan bhumre) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. भुमरे यांच्या या टीकेवर राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पलटवार केला आहे. कोरोना काळात तुम्हीही काय केलं हे तपासलं पाहिजे. तुम्ही दिवसा काय करत होता आणि रात्री काय करत होता हे काढायला लावू नका, असा इशारा देतानाच भुमरेंनी नमक हरामी आणि हरामखोरीची भाषा करू नये, असा सज्जड दमच अंबादास दानवे (ambadas danve) यांनी भरला आहे.
अंबादास दानवे मीडियाशी संवाद साधत होते. कोरोनाचं संकट केवळ महाराष्ट्र नाही तर देशावर होतं. जगावर होतं. त्यामुळे मास्क लावणं हाच जीव वाचवण्याचा पर्याय होता. या मास्कनेच महाराष्ट्राला वाचवलं. उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्राने रस्त्यावर प्रेतं फेकून दिली नाही. महाराष्ट्र कधी थाळ्या वाजवत बसला नाही. कधी दिवे लावत बसला नाही. कोरोना काळात खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे यांनी प्रॅक्टिकल काम केलं आहे, असं अंबादास दानवे म्हणाले.
शिवसेनेचा दसरा मेळावा नैसर्गिरित्या होत असतो. या मेळाव्याला येणारा शिवसैनिक स्वत:च्या खर्चाने येतो. सोबत भाजीभाकरी घेऊन येतो. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर श्रद्धा व्यक्त करण्यासाठी येतो. परंतु, बाकीच्यांना गर्दी जमवण्यासाठी बस कराव्या लागत आहेत. रस्त्याने येताना खाण्यापिण्याची व्यवस्था करावी लागत आहे, असा खोचक टोला दानवे यांनी शिंदे गटाला लगावला.
राज्य सरकारने काल पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. यांना मंत्री ठरवताना ननाकीनऊ आले आहेत. पालकमंत्री ठरवताना दीड पावणे दोन महिने लागले. एकाच मंत्र्याकडे सहा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं. त्यामुळेच हे सरकार विसंवादी आणि असंवेदनशील आहे. या सरकारला फक्त सत्तेच्या वाटपात इंटरेस्ट आहे, अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान, दानवे यांनी काल औरंगाबादच्या कर्णपुरा यात्रेचा आढावा घेतला. कर्णपुरा यात्रेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सोयी सुविधा, महिलांची सुरक्षा, 24 तास आरोग्य सेवा, स्वच्छ्ता विद्युत पुरवठा याचबरोबर यात्रेदरम्यान यात्रेकरु नागरिक व भक्तांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात तसेच प्रत्येकांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. कुठल्याही बाबतीत हलगर्जीपणा होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.