औरंगाबाद: शिवसेनेविरोधात बंड करून दोन महिने झाल्यानंतर अचानक शिंदे गटाचे बंडखोर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचं एक ट्विट व्हायरल झालं आहे. या ट्विटमध्ये शिंदे यांनी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचा कुटुंब प्रमुख असा उल्लेख केला होता. शिरसाट यांचं हे ट्विट प्रचंड व्हायरल झालं. शिरसाट हे एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असून ते घरवापसी करण्याची शक्यता आहे, अशी चर्चाही या निमित्ताने केली जात होती. या ट्विटनंतर शिंदे गटाच्या आमदारांनी शिरसाट यांच्याशी तातडीने संपर्क साधला. त्यानंतर सारवासारव सुरू झाली आणि शिरसाट यांनीही लागलीच हे ट्विट डिलीट केलं. मोबाईलच्या टेक्निकल प्रॉब्लेम झाल्याने ही पोस्ट व्हायरल झाल्याचा दावा त्यांनी केला. आपण शिंदे यांच्यावर नाराज नाही. पण कॅबिनेट मंत्रीपद हवंय, असंही सांगण्यास ते विसरले नाहीत. शिरसाट यांच्या ट्विटवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रतिक्रिया देत शिरसाट यांना चिमटे काढले आहेत.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकच वाक्य तीन वेळा सांगितलं. ते म्हणजे, शिरसाट यांचं ट्विट रात्रीचं होतं. शिरसाट यांचं ट्विट रात्रीचंच होतं. सकाळच नव्हतं. एवढेच सांगेल, असा टोला लगावतानाच आगे आगे देखो होता है क्या?; असा सूचक इशाराही अंबादास दानवे यांनी दिला.
दरम्यान, अंबादास दानवे यांनी आज शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची भेट घेतली. यावेळी खैरे यांनी दानवे यांना पेढा भरवून नव्या इनिंगच्या शुभेच्छा दिल्या. संघटना वाढवण्यासाठी आणि खैरे यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांची भेट घेतल्याचं दानवे यांनी यावेळी सांगितलं. तर दानवे आणि आम्हाला मिळून पाच फुटीर आमदारांना आडवे करायचं आहे. आम्ही एक कुटुंब आहोत. शिवसेना हे कुटुंब आहे. त्यामुळे दानवे यांच्याशी माझे मतभेद व्हायचे. हे तात्त्विक मतभेद होते. कुटुंब म्हटलं तर वादविवाद होतातच. पण आमचं प्रेम आहे. आदेशाचं प्रेम आहे. पक्षप्रमुखांचा आदेश आला की तो पाळायचाच हे माझं धोरण आहे. मात्र, आता दानवे यांच्याशी कोणतेही वाद नाही, असं खैरै म्हणाले.
यावेळी चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांची तोंडभरून स्तुती केली. दानवे अभ्यासू आहेत. ते ग्रंथालयात बसून अभ्यास करत असतात. वाचन करत असतात. आधीच्या विरोधी पक्षनेत्यांनी कसे काम केले, आपण काय केले पाहिजे, याचा ते अभ्यास करतात. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते. त्यांच्यापेक्षाही दानवे चांगले काम करतील, असा दावाही खैरे यांनी केला.