भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर आहेत. सोमवारी रशियात दाखल झालेल्या पीएम मोदी यांचं रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी जोरदार स्वागत केलं. पीएम मोदी यांच्या या दौऱ्यावर जगाच लक्ष आहे. मोदी आणि पुतिन यांची ही मैत्री अमेरिकेसाठी चिंतेचा विषय आहे. भारताचे अमेरिका आणि रशिया दोघांशी चांगले संबंध आहेत. अमेरिका आणि रशिया यांच्या संबंधातील तणाव जगजाहीर आहे. पीएम मोदी यांची रशियन राष्ट्रपतींबरोबर घनिष्ठता अमेरिकेला पसंत नाहीय.
रशियात पीएम मोदी यांची राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबर अनौपचारिक बैठक झाली. सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. अमेरिकेसह युरोपियन देश पुतिन यांना एकट पाडण्याचा प्रयत्न करतायत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर प्रेस ब्रीफिंगमध्ये म्हणाले की, “रशियन राष्ट्रपतींसोबत पंतप्रधान मोदी यांनी काय चर्चा केली? त्याची आम्ही माहिती घेऊ” “भारत-रशिया संबंधांमुळे आम्ही चिंतित आहोत, हे अमेरिकेने आधीच स्पष्ट केलय” असं मॅथ्यू मिलर म्हणाले.
अमेरिकेला भारताकडून काय अपेक्षा?
अमेरिकेला भारताकडून काय अपेक्षा आहे, ते सुद्धा मॅथ्यू मिलर यांनी स्पष्ट केलं. “भारत किंवा अन्य कुठलाही देशाने रशियाला सांगितलं पाहिजे की, संयुक्त राष्ट्र चार्टर आणि यूक्रेनच्या अखंडतेचा सन्माम करा” असं मिलर म्हणाले. अमेरिकन प्रवक्त्याच्या विधानांवरुन हे स्पष्ट होतं की, भारत-रशियाची निकटता अमेरिकेला आवडलेली नाही.
अमेरिकेची चिंता काय?
“भारत आमचा रणनितीक भागीदार असून त्यांच्यासोबत आम्ही स्पष्टपणे बोलतो. रशियासोबत भारताचे जे संबंध आहेत, त्याबद्दल आम्हाला वाटणाऱ्या काही चिंता सुद्धा आहेत” असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले.
अमेरिकेला नाही जुमानलं
2022 साली रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरु झालं. अमेरिकेने सतत भारतावर रशियापासून अंतर ठेवण्यावर दबाव टाकला. अमेरिकेचा हा दबाव भारताने कधीच जुमानला नाही. भारताने रशियासोबतचे आपले जुने संबंध आणि आर्थिक गरजांचा दाखले दिला. रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर भारताने शांततामय मार्गाने तोडगा काढण्याचा सल्ला दिला. अमेरिकेने युक्रेनची बाजू घेतली. युक्रेनला शस्त्रास्त्र दिली.