पुणे : भाजपशी असलेली 25 वर्षाची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेनं सत्तास्थापना केली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, भाजप नेत्यांच्या मनातील शल्य अद्यापही कमी झालेलं नाही. कारण, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit shah) यांनी आज पुण्यातून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ‘दोन पिढ्यांपासून ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्याच मांडीवर जाऊन बसेल’, असा घणाघात शाह यांनी केलाय. ते आज पुण्यातील भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
शिवसेनेवर टीका करताना शाह म्हणाले की, ‘2019 मध्ये महाराष्ट्रात निवडणुका होत्या. त्यावेळी मी स्वत: इथे आलो होतो. मी स्वत: शिवसेनेशी संवाद साधला. तेव्हा फडणवीसांच्या नेतृत्वातच निवडणुका लढायचं ठरलं होतं. मुख्यमंत्रीही भाजपचाच होणार हे सुद्धा ठरलं होतं. पण शिवसेना फिरली. त्यांनी हिंदुत्वाशीही तडजोड केली. दोन पिढ्यांपासून ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्याच मांडीवर जाऊन बसेल आणि म्हणतात आम्ही असं म्हणालोच नाही’, अशी जोरदार टीका शाह यांनी शिवसेनेवर केलीय.
महाराष्ट्र के पुणे में भाजपा कार्यकर्ता सम्मेलन में आए बूथ कार्यकर्ताओं के साथ संवाद करते हुए। https://t.co/zblJi0aZdK
— Amit Shah (@AmitShah) December 19, 2021
‘ते म्हणतात मी खोटं बोलत आहे. ठिक आहे. मी खोटं बोलतोय असं मानू. पण तुमच्या सभेच्या पाठी जे बॅनर लागत होते त्यावर तुमच्या फोटोची आणि मोदींच्या फोटोची साईज पाहा. तुमची केवळ एक चतुर्थांश होती. प्रत्येक भाषणात तुम्हाला मोदींचं नाव घ्यावं लागत होतं. तुमच्या उपस्थित मी आणि मोदींनी सांगितलं होतं फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या आहेत आणि एनडीए निवडणूक जिंकल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होतील. पण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं. तुम्ही आमच्यासोबत विश्वासघात केला सत्तेत बसले’, असा घणाघातही शाह यांनी केलाय.
देशात इंधर दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत होता. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी इंधनाचे दर कमी करण्याचा निर्णय घेत त्यावरील टॅक्स कमी केला. त्यावेळी मोदींनी राष्ट्राला संबोधित करताना राज्य सरकारांनीही आपला कर कमी करण्याचं आवाहन केलं. भाजपशासित राज्यांनीही मोदींच्या आवाहनला प्रतिसाद देत इंधनावरील कर कमी केला. पण यांना काही वेगळंच ऐकायला आलं, यांनी इंधन नाही तर दारू स्वस्त केली. असे भाई, दारू स्वस्त करायची नव्हती, तर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करायचं होतं, अशी खोचक टीका शाहांनी केलीय. तसंच आता उद्धव ठाकरे सरकारला विचारायला हवं की देशात पेट्रोल-डिझेल 15 रुपयांनी स्वस्त झालं, महाराष्ट्रात का नाही? महाराष्ट्रातील जनतेला दारु नाही तर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त हवं आहे, असंही शाह म्हणाले.
इतर बातम्या :