मुंबई: भाजपचे चाणक्य आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सिंधुदुर्गात येऊन थेट शिवसेना आणि महाविकास आघाडीला ललकारले आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच अमित शहाने या सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. त्यामुळे शहा अॅक्शन मोडमध्ये आले असून ही ऑपरेशन लोट्सची नांदी असल्याचंही बोललं जात आहे. तर, भाजपला मनसेच्या रुपाने नवा पर्याय मिळाला असावा म्हणूनच शहा यांनी मनसेवर टीका केली असावी, असंही बोललं जात असून शहांच्या चाणक्य नितीमागे नेमकं दडलं काय? यावर आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (amit shah slams cm uddhav thackeray in sindhudurg program)
शहा नेमकं काय म्हणाले?
अमित शहा यांनी सिंधुदुर्गात येऊन घणाघाती भाषण केलं. यावेळी त्यांनी आघाडी सरकारची पिसे काढली. शिवसेनेने बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत आली आहे, अशी टीका अमित शहा यांनी केली. आम्ही कुणालाही कसलंही आश्वासन दिलं नव्हतं. आम्ही वचन दिलं हे सफेद झूठ आहे. बंद दाराआड झालेल्या चर्चेदरम्यान मी काही आश्वासन दिल्याचं सांगितलं जातं. मी कधीच बंद कमऱ्याचं पॉलिटिक्स करत नाही. जे आहे ते सडेतोड बोलतो. ठोकून बोलतो. उघड बोलतो. मी तु्म्हाला कधीच कोणतं आश्वासन दिलं नव्हतं. आम्ही बिहारमध्ये नितीशकुमार यांना वचन दिलं आणि ते पाळलंही, असंही ते म्हणाले. उद्धवजी, आम्ही तुम्हाला आश्वासन दिलं म्हणता, मग निवडणुकीतील प्रत्येक भाषणात आम्ही राज्यातील एनडीएच्या सरकारचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसच करणार असल्याचं आम्ही सांगायचो. तेव्हा विरोध का केला नाही. तुमच्या समोरच मी आणि मोदींनीही फडणवीसच राज्याचं नेतृत्व करतील असं अनेकदा सांगितलं. तेव्हा तुम्ही त्याला आक्षेप का घेतला नाही, असा सवालही त्यांनी केला.
महाराष्ट्रात ऑपरेशन लोट्स होणार?
अमित शहा यांनी कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेवर टीका केली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दीड वर्षे पूर्ण झाल्यानंतर शहा यांनी टीका केली. त्यामुळे शहा या सरकारविरोधात आक्रमक झाल्याचं सांगण्यात येतं. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाने केंद्र सरकारची डोकेदुखी ठरली आहे. त्यातच महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनात हवा भरून सरकारची आणखीनच डोकेदुखी वाढवत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडे शहांची वक्रदृष्टी वळल्याचं सांगितलं जात आहे. शहा यांनीच सरकारवर टीका केल्याने राज्यात ऑपरेशन लोट्स सुरू होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
राणेंना शहांचं बळ
या दौऱ्याच्या निमित्ताने शहा यांनी नारायण राणे यांना बळ दिल्याचं सांगितलं जातं. राणेंवर अन्याय होणार नाही, असं सागून राणेंवर आगामी काळात मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे संकेतही दिल्याचं सांगितलं जातं. राणेंना केंद्रात मंत्रीपद देऊन राज्यात पक्ष वाढीसाठी कामाला लावायचे किंवा फडणवीसांना केंद्रात मंत्रीपद देऊन राणेंना राज्यात मोठी जबाबदारी देण्याची शहांची रणनीती असू शकते, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.
शिवेसेनेसोबत युती नाहीच?
शहा यांच्या या टीकेचे अनेक अर्थ काढले जात आहेत. शहांच्या बॉडी लँग्वेजवरून त्यांनी आता शिवसेनेसोबत युती न करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. शिवसेनेने खोटं ठरवल्याचा घाव शहांना वर्मी लागल्याचं आजच्या त्यांच्या भाषणातून स्पष्टपणे जाणवत होतं. त्यामुळेच शिवसेनेसोबत यापुढे कोणतेही संबंध ठेवायचे नाही. शिवसेनेसोबत युतीऐवजी संघर्ष करायचा, असे संकेतच शहा यांनी आजच्या भाषणातून पक्षाला दिल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. (amit shah slams cm uddhav thackeray in sindhudurg program)
भाजपचा नवा भिडू मनसे?
शहा यांनी थेट शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शिवसेनेने तापी नदीत बुडवल्याची अत्यंत खोचक टीका शहा यांनी केली. शहा यांनी पहिल्यांदाच एखाद्या राजकीय पक्षावर एवढी खोचक टीका केली असेल. पूर्ण होमवर्क केल्याशिवाय आणि शिवसेनेला नवा पर्याय मिळाल्याशिवाय शहा शिवसेनेला अंगावर घेऊच शकणार नाहीत, असं राजकीय निरीक्षक सांगतात. मधल्या काळात प्रसाद लाड, आशिष शेलार या नेत्यांच्या राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजवर फेऱ्या वाढल्या होत्या. त्यानंतर राज यांनी अयोध्येचा दौराही आयोजित केला. त्यामुळे मनसेसोबतचं युतीचं घोडं गंगेत न्हालं असावं, म्हणूनच शहा यांनी शिवसेनेला भिडण्याची भाषा केली असावी, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. (amit shah slams cm uddhav thackeray in sindhudurg program)
नारायण राणेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर थेट ‘प्रहार’; अमित शहांच्या भाषणातील 5 घणाघाती मुद्दे https://t.co/iiZLEijAPj #AmitShah #NarayanRane @BJP4Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 7, 2021
संबंधित बातम्या:
नारायण राणेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर थेट ‘प्रहार’; अमित शहांच्या भाषणातील 5 घणाघाती मुद्दे
अमित शाहांना उद्घाटनासाठी कोकणात आणणारे राणे हे हुशार राजकारणी: चंद्रकांत पाटील
बाळासाहेब ठाकरेंचे सर्व सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत; अमित शहांची उद्धव ठाकरेंवर थेट टीका
(amit shah slams cm uddhav thackeray in sindhudurg program)