Image Credit source: tv9 marathi
पाटणा: मुख्यमंत्री नितीश कुमार (nitish kumar) आणि भाजपमध्ये (BJP) तू तू मै मै सुरू झाल्याने बिहारमध्ये राजकीय संकट घोंघावत आहे. नितीश कुमार आता भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. आरजेडी, डावे आणि काँग्रेससोबत नवी आघाडी करण्याच्या त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. एवढेच नव्हे तर नितीश कुमार यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्याने भाजपच्या तंबूत खळबळ उडाली आहे. उद्या 9 ऑगस्ट रोजी जेडीयूने (JDU) आपल्या खासदार आणि आमदारांची बैठक बोलावली आहे. ही बैठक राजधानी पाटणा येथे होणार आहे. स्वत: मुख्यमंत्री नितीश कुमार या बैठकीला संबोधित करणार आहेत. यावेळी जेडीयू मोठा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार भाजपशी जुळवून घ्यायला तयार नाहीत. उद्या ते आपला निर्णय जाहीर करतील. भाजपचे गृहमंत्री अमित शहा यांना बिहारचा संपूर्ण कंट्रोल आपल्या हाती हवा आहे. त्यामुळे जेडीयूत फूट पाडली जात आहे, असा आरोपही होऊ लागला आहे. मात्र, त्यात किती तथ्य आहे, यावर टाकलेला हा प्रकाश.
बेबनावाची दहा कारणे
- मुख्यमंत्र्यांची पक्षावरील पकड कमी करण्याचा भाजपकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप जेडीयूकडून करण्यात आला आहे. उद्या जेडीयूची महत्त्वाची बैठक होत आहे. ज्या आमदारांशी संपर्क साधून पक्ष बदण्याची ऑफर भाजपने दिली होती, अशा आमदारांना उद्याच्या बैठकीत जेडीयू सर्वांसमोर आणणार आहे.
- उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते तारकिशोर प्रसाद यांची नितीश कुमार यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी भाजप-जेडीयू संघर्षावर नितीश कुमार यांनी भाष्य केलं. यात काहीच गंभीर नाही, असं नितीश कुमार म्हणाले होते.
- मागच्या वर्षीच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या विरोधात काम केल्याचा आरोप जेडीयूकडून भाजपवर केला जात आहे. तसेच भाजपने जेडीयू कार्यकर्त्यांचा अनादर केल्याचा आरोपही जेडीयूने केला आहे. तसेच येणाऱ्या काळात केवळ भाजपच राहील. प्रादेक्षिक पक्ष संपुष्टात येणार असल्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले होते. नड्डा यांच्या या विधानावरही जेडीयूने नाराजी व्यक्त केली आहे.
- मुख्यमंत्री आता शांत राहण्याच्या मूडमध्ये नाहीत, असं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं. उद्या ते आपल्या आमदार आणि खासदारांसोबत बसून निर्णय घेणार आहेत. तर, आम्हाला मध्यावधी निवडणुका नकोत. त्यापेक्षा कुणाशी तरी आघाडी करून सरकार स्थापन करा, अशी मागणी जेडीयूच्या आमदारांनी नितीश कुमार यांच्याकडे केली आहे.
- तर, नितीश कुमार यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यास तेजस्वी यादव नितीश कुमार यांना समर्थन देतील. राजद हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. राजद, जेडीयू, काँग्रेस आणि डाव्यांनी एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन केल्यास राज्याला नवं आणि मजबूत सरकार मिळणार आहे.
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीश कुमार यांचा सर्व राग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आहे. अमित शहा यांना बिहार सरकारचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात हवा आहे. त्यामुळे नितीश कुमार नाराज आहेत. शहा यांच्या या कृतीचा विरोध दाखवण्यासाठीच नितीश कुमार यांनी पंतप्रधानांनी बोलावलेल्या अनेक बैठकांना गैरहजेरी लावली. काल नीती आयोगाची बैठक होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाचारण केलं होतं. पण नितीश कुमार या बैठकीला गेले नाही. त्यांनी पाटणा येथील सरकारी कार्यक्रमांना हजेरी लावली.
- बिहारमध्ये जे राजकीय संकट ओढवलं आहे, त्याला आरसीपी सिंह जबाबदार असल्याचं सांगितलं जाद आहे. आरसीपी सिंह यांनी शनिवारी जेडीयूला रामराम ठोकला. ते जेडीयूचे राज्यसभा खासदार होते. तसेच केंद्रातील मोदी सरकारमध्ये मंत्रीही होते. तिसऱ्यांदा त्यांना राज्यसभेवर पाठवलं गेलं नाही. त्यामुळे त्यांचे मंत्रिपदही गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शहा यांच्या इशाऱ्यावर आरसीपी सिंह हे जेडीयूमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याची कुणकुण नितीश कुमार यांना लागली होती.
- नितीश कुमार यांनी भाजपकडे काही मागण्या केल्या आहेत. केंद्रात अधिक मंत्रीपदे द्यावीत, गेल्यावेळी केवळ एकच मंत्रिपद दिलं होतं. बिहार विधानसभेची निवडणूक आणि लोकसभेची निवडणूक एकत्रच व्हावी. लोकसभेनंतर बिहारची निवडणूक नको, तसेच बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार हेच भाजप-जेडीयू आघाडीचा चेहरा असावेत, आदी मागण्या नितीश कुमार यांनी भाजपला केल्या होत्या. त्यावर भाजपने कोणताही निर्णय घेतलेला नाही.
- 2013पासून भाजप आणि नितीश कुमार यांची आघाडी आहे. परंतु, मधल्या काळात मोदींना भाजपने पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर नितीश कुमार यांनी भाजपसोबतची आघाडी तोडली. त्यानंतर त्यांनी पुन्हा आरजेडी आणि काँग्रेसशी हातमिळवणी करून 2015ची निवडणूक जिंकली. मात्र, मधल्या काळात आरजेडीवर भ्रष्टाचाराचा आरोप करून नितीश कुमार यांनी आरजेडीची साथ सोडली. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपशी युती केली.
- उद्याच्या खासदार आणि आमदारांच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत मोदींना कशी टक्कर द्यायची यावर चर्चा केली जाणार आहे. मोदींची लोकप्रियता अधिक आहे. त्यामुळे नितीश कुमार उद्या रणनीती तयार करण्याची शक्यता आहे. तसेच बिहारमध्ये भाजपने कुणाला मंत्रिपदे द्यावीत हे ठरवण्याचा अधिकारही आपल्याला मिळावा, असा नितीश कुमार यांचा आग्रह असल्याचं सांगितलं जातं.