मुंबई – एककीकडे एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेना घायाळ (Shivsena) झाली असताना दुसरीकडे मनसे कमबॅकची संधी शोधत आहे. ऐन पावसाळ्यात अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी कोकण पिंजून काढलंय. मुसळधार पाऊस कोसळत असतानाही सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तीन जिल्ह्यांचा सात दिवसीय मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क दौरा करून मुंबईत परतल्यावर चारच दिवसात अमित ठाकरे यांनी त्यांची कोकण टीम जाहीर केली आहे. या तिन्ही जिल्ह्यातील मनविसेचे जिल्हाध्यक्ष त्यांनी आज जाहीर केले तसंच या सर्वांना मुंबईत बोलावून त्यांना नेमणूक पत्रही दिले. जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात मनविसेचे युनिट स्थापन करा, आगामी सिनेट निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा आणि अधिकाधिक पदवीधरांची नोंदणी करा असे आदेशही त्यांनी या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
मनसे नेते अमित ठाकरे यांनी कोकण दौरा करत ही दहा जणांची तगडी टीम तयार केली आहे. आगामी काळात महापालिका निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकात चांगली कामगिरी बजावण्याची जबाबदारी या दहा जणांवर असणारा आहे. तर दुसरीकडे शिवसेनेतली पडझड अजूनही सुरूच आहे. आज ही अनेक नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन देत ठाकरेंना आणखी एक धक्का दिला आहे. त्यामुळे मनसेसाठी हे सर्वात मोठे संधी असणार आहे. शिंदे आणि ठाकरेंच्या भांडणात मनसेची मतं आगामी निवडणुकीत नक्कीच वाढू शकतात, असा अंदाजही अनेक राजकीय पंडित बांधत आहेत. तसेच अलिकडे भाजप आणि मनसेची जवळीकही चांगलीच वाढली आहे. त्याच्याही बऱ्याच चर्चा आहेत. आगामी निवडणुकीत भाजप आणि मनसेची युती झाली तर कुणालाही आश्चर्य वाटणार नाही.