अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावरुन बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा या मैदानात होणार आहे. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या पक्षाचे उमेदवार दिनेश बूब यांच्या प्रचारासाठी 24 एप्रिलला सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी प्रहार पक्षाला 23 आणि 24 एप्रिल तारखेची परवानगी मिळाली होती. पण हे मैदान आता सभेसाठी भाजपाला देण्यात आलय. त्यावरुन बच्चू कडू आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांशी वाद घातला. यावर आज भाजपा उमेदवार नवनीत राणा यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. “देशाचे गृहमंत्री अमित शाह येत आहेत. मैदानासाठी पहिला विनंती अर्ज केला होता. राजकीय मतदान होईपर्यंत असे वाद होत असतात. आपल्या पक्षाचा मोठा नेता त्या क्षेत्रात येतोय, त्यांच्या पक्षाचा मोठा नेता असता, मैदानाची मागणी केली असती, तर मैदान दिलं असतं. तेवढी परिपक्वता दाखवली पाहिजे” असं नवनीत राणा म्हणाल्या.
आज अमरावतीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा होत आहे. त्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर नवनीत राणा म्हणाल्या की, “राहुल गांधीची सभा अमरावती होतेय, त्याचा मला अभिमान वाटतो. पाचवर्ष ज्या पद्धतीने काम केलं, जनतेची सेवा केली, त्यामुळे देशातील नेत्यांना नवनीन राणाला पराभूत करण्यासाठी इथे याव लागतय. याचा अभिमान वाटतो. माझी अमरावती कशी आहे? हे त्यांनी पाहाव”
‘बच्चू भाऊ माझ्यापेक्षा खूप मोठे’
पैशाच आमिष दिल्याचा आरोप बच्चू कडू यांनी तुमच्यावर केलाय. त्यावरही नवनीत राणा यांनी उत्तर दिलं. “बच्चू भाऊ माझ्यापेक्षा खूप मोठे, सिनिअर आहेत. त्यांचा अनुभव ते जाहीर करतायत. जास्त काही बोलणार नाही. माझा लक्ष्य माझा मतदारसंघ आहे” असं नवनीत राणा म्हणाल्या. प्रतिसाद कसा मिळतोय? त्यावर त्यांनी सांगितलं की, “देशामध्ये मोदींची हवा आहे. अमरावतीकर महिला, जनता माझ्या पाठिशी आहे. मला जास्त विचार करण्याची गरज नाही, मोदीजींची हवा होती आणि राहणार”