अमरावतीः नवनीत राणा (Navneet Rana) घाबरून थांबणारी नाही, लढणारी आहे. मी लढत राहणार. सुरक्षा तर मला आहेच, असं वक्तव्य अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलं. राणा यांच्या जीलावा धोका आहे, असं पत्र एका हितचिंतकाने पाठवल्याचं समोर आलं आहे. राजस्थानातून (Rajasthan) काही लोक अमरावतीत आले आहेत. त्यांनी तुमच्या घराची रेकीदेखील केली आहे. तुम्ही काळजी घ्या, अशा आशयाचं पत्र नवनीत राणा यांना मिळालं आहे. 21 जुलै रोजी अमरावतीत झालेल्या उमेश कोल्हे (Umesh Kolhe) हत्याकांडाशी तसेच काही महिन्यांपूर्वी झालेल्या दंगलीत मी आक्रमक भूमिका घेतली होती, म्हणून अशा प्रकारच्या धमक्या येत असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं.
नवनीत राणा म्हणाल्या, ‘राजस्थानमधून काही लोक अमरावतीत आले आहेत, असा पत्रात उल्लेख आहे. मध्यंतरी कोल्हे परिवारासोबत जी दुर्घटना झाली. त्याआधी हिंदु-मुस्लिम दंगे झाले होते. त्यावरूनच ही धमकी दिलेली असावी. मी महिला आहे म्हणून परिवाराला धक्का पोहोचला आहे. पण नवनीत राणा थांबणारी नाही. लढणारी आहे. या धमकीच्या पत्राची माहिती गृहमंत्री अमित शहा यांना देण्यात येणार आहे.
दरम्यान, सदर पत्र पाठवणारा मला धमकावत आहे की अजूनही मला चेतावणी देत आहे, याचा तपास करण्यास मी सांगितले आहे. पोलिसांनी आमच्या घरी सीसीटीव्ही लावले आहेत.. हे पत्र कसे आले हे जाणून घेण्यासाठी त्या सीसीटीव्हीचे प्रत्येक सेकंदाचे फुटेज पाहिले जात आहे. हे पत्र सिक्युरिटी गार्डच्या ड्रायव्हरचे पडले होते.. मागच्या 15 चे फुटेज तपासायला सांगितले आहे, अशी माहिती नवनीत राणा यांनी दिली.
नवनीत राणा यांना मिळालेल्या धमकीच्या पत्रावर भाजप नेते नितेश राणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. नवनीत यांना धमकी मिळाली तरीही त्यांचं कुणीही काहीही बिघडवू शकणार नाही, कारण त्यांच्या नावातच ‘राणा’ आहे, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं.
नवनीत राणा यांनी या धमकीचा संबंध उमेश कोल्हे हत्या प्रकरणाशी असू शकतो असा संशय व्यक्त केला आहे. 54 वर्षांचे केमिस्ट उमेश प्रल्हादराव कोल्हे यांची 21 जून रोजी हत्या करण्यात आली होती. भाजप नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ त्यांनी सोशल मीडियावर टिप्पणी केली होती. त्यांच्या पोस्टा व्हायरल केल्या होत्या. त्यानंतर दोन बाइकस्वारांनी धारदार शस्त्राने त्यांची हत्या केली होती.