मुंबई : अमरावतीमधील दंगलीनंतर आता राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर गंभीर आरोप केलाय. शेलार यांचा एक फोटो दाखवत मलिक यांनी, शेलारांनी रझा अकादमीच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. हा षडयंत्राचाच भाग होता का? असा सवाल केलाय. मलिकांच्या या आरोपाला आता शेलार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Ashish Shelar responds to allegations made by Nawab Malik)
‘नवाब मलिक यांना मी मराठीतील ती म्हण पुर्ण सांगणार नाही. पण तुमची खोड काही जात नाही, एवढे मात्र खरे. अशा पद्धतीने दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोंच्या जीवावर अफवांचे राजकारण करणं हा तुमचा धंदा आहे. पण त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेली दंगलींचा आणि सन 2016 -17च्या फोटोचं संबंध काय?
माझ्या या फोटोचा रझा अकादमीच्या फोटोशी संबंध काय? ही बैठक रझा अकादमीच्या कार्यालयात झालेली नाही. जुन्या कुठल्यातरी फोटोचा दाखला देऊन आजच्या दंगलीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या अपयशाला लपवण्याचे काम तुम्ही करू नका. तुमची खोड जात नसेल तर असे असंख्य फोटो रझा अकादमी सोबतचे आम्हाला दाखवावे लागतील. तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही’, असा इशाराच आशिष शेलार यांनी मलिकांना दिलाय. महाराष्ट्र विकास आघाडीने आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही फोटोचं राजकारण बंद करावं, असं आवाहनही शेलारांनी केलंय.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यात झालेल्या दंगलीवरून भाजवर गंभीर आरोप केले. आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात बसले होते. त्यांची रझा अकादमीच्या नेत्यांशी मिटिंग झाली. माझ्याकडे एक फोटो आहे. हा सुद्धा षडयंत्राचा हिस्सा होता की नाही माहीत नाही. पण राज्यात रझा अकादमीची ताकद नाही. त्यांचे काही मौलाना शहरात फिरत असतात. मात्र, राज्यात दंगल भडकवतील एवढी त्यांची ताकद नाही. पण त्यांच्या कार्यालयात बसून शेलार मिटींग करत होते. त्याची चौकशी होईल. सर्व दंगल करणाऱ्यांना अटक करण्यात येईल, असं मलिक म्हणाले.
भाजपने बंदच्या आडून सुनियोजितपणे दंगली भडकवण्याचं काम केलं. पोलिसांनी हा कट उधळून लावला. राज्यात दंगल भडकवण्याचे भाजपचे षडयंत्र होते. राज्यातील जनतेने संयम राखला. त्यामुळे राज्यात इतर ठिकाणी दंगली भडकल्या नाही. अमरावती सोडून कुठेच काही घडलं नाही. अमरावतीत कोणत्याही दोन समुदायात दंगल झाली नाही. भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी 2 तारखेच्या रात्री दंगलीचं षडयंत्रं रचलं. दारु वाटल्या गेली, पैसे वाटण्यात आले… दंगली भडकावल्या गेल्या, असा आरोपही मलिक यांनी केलाय.
इतर बातम्या :
आनंदराव अडसूळांचा तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला, अडचणी वाढणार?
Ashish Shelar responds to allegations made by Nawab Malik