बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते, अमृता फडणवीसांचा टोला

| Updated on: Oct 14, 2020 | 9:28 AM

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनीही उडी घेतली आहे. (Amruta Fadnavis on CM uddhav thackeray and Governor Bhagat singh letter war)

बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते, अमृता फडणवीसांचा टोला
Follow us on

मुंबई : राज्यातील मंदिर सुरु करण्यावरुन सध्या राजकारण सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात या मुद्द्यावरुन लेटर वॉर सुरु आहे. यात आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनीही उडी घेतली आहे. दारुची दुकानं सुरु आहेत, मग मंदिरं काय धोकादायक क्षेत्रात आहेत का? असा सवाल अमृता फडणवीसांनी उपस्थित केला आहे. (Amruta Fadnavis on CM uddhav thackeray and Governor Bhagat singh letter war)

“वाह प्रशासन! महाराष्ट्रात दारुची दुकानं, शॉप्स सगळीकडे सुरु झाली. मग मंदिरं काय धोकादायक क्षेत्रामध्ये आहेत का? अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते!” असे ट्विट अमृता फडणवीसांनी केले आहे.

नेमकं प्रकरणं काय?

राज्यातील मंदिरं सुरु करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करुन दिली होती. राज्यपालांच्या या पत्राला मुख्यमंत्र्यांनी ठाकरे शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तुमच्याकडून हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचं सांगितले.

राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात हिंदुत्वाचा उल्लेख केला होता. राज्यापालांच्या पत्राला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी अभिनेत्री कंगना रानौतच्या वक्तव्याचा धागा पकडत राज्यपालांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत स्वागत करणं हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही’, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपालांना दिलं आहे.

राज्यपालांच्या पत्रात काय?

“तुम्ही एक जूनला पुनश्च हरिओम म्हणत लॉकडाऊन या शब्दाला केराची टोपली दाखवलीत. त्यामुळे लॉकडाऊनला वैतागलेल्या जनतेच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला. दुर्दैवाने चार महिन्यांनंतरही प्रार्थना स्थळांवरील बंदी कायम राहिली. राज्य सरकारने रेस्टॉरंट, बार आणि बीचवर जाण्यास परवानगी दिली असताना देव-देवता लॉकडाऊनमध्ये असणं, यासारखा विरोधाभास नाही.” असा टोला राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे लगावला होता.(Amruta Fadnavis on CM uddhav thackeray and Governor Bhagat singh letter war)

संबंधित बातम्या : 

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या लेटर वॉरमध्ये कंगनाची उडी, ठाकरे सरकराला ‘गुंडा’ची उपमा

‘कलम 370 हटवणे हा काश्मीरसाठी काळा दिवस’, सुटकेनंतर मेहबुबा मुफ्ती यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल