हैदराबाद: देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्याची एकही संधी राजकीय पक्ष सोडत नाहीत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशात टीडीपी सरकारने अशीच एक घोषणा केली आहे. चंद्राबाबू नायडू सरकार ब्राम्हण युवकांना कार वाटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरुवातीला 30 बेरोजगार ब्राम्हण युवकांना ही कार देण्यात येणार आहे.
‘स्वयंम रोजगार’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून कारवाटप करण्यात येणार आहे. हे कारवाटप पूर्णपणे मोफत नसून, लाभार्थ्यांना कारच्या किंमतीच्या दहा टक्के रक्कम भरावी लागणार आहे. युवकांना स्विफ्ट डिझायर ही कार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ब्राम्हण क्रेडिट सोसायटीकडून या कारसाठी 2 लाखांपर्यंतचं अनुदान मिळणार आहे. ब्राह्मण वेलफेयर कॉर्पोरेशन या संस्थेकडून युवकांना अनुदानही देण्यात येणार आहे. ‘स्वयंम रोजगार’च्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 50 कार वाटण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
एका नियोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंच्या हस्ते युवकांना कारच्या चाव्या देण्यात येतील. आंध्र प्रदेश सरकारने एक पाऊल पुढे टाकत, 40 लाख स्मार्टफोनही बेरोजगार युवकांना वाटण्याचा निर्णय घेतला आहे.
एनडीएतून बाहेर पडल्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू मोदींच्या मागे हात धुवून लागले आहेत. मोदींना टार्गेट करण्याची ते एकही संधी सोडत नाहीत. राज्यात सीबीआयला बंदी घालत, चंद्राबाबू नायडू यांनी अप्रत्यक्षपणे मोदींना टार्गेट केलं होतं. आता नायडू सरकारचं मोफत कारवाटपही मतदारांना आकर्षित करण्यासोबतच मोदी सरकारला टार्गेट करण्याचा एक नवा खेळ असल्याचं बोललं जात आहे.