मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थआनी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून छापेमारी सुरु होती. सकाळी 8 वाजेपासून सुरु असलेली ही छापेमारी तब्बल 9 तास चालली. या छापेमारीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास संत्रणांवर जोरदार टीका केलीय. आमच्यासाठी हे नवं नाही, अनिल देशमुखांच्या कुटुंबीयांवर, त्यांच्या मुलाच्या व्यवसायावर केंद्राने लक्ष ठेवलं होतं. त्यांच्या हाती काही लागलं नाही. त्या नैराश्यातून हा त्रास देण्याचा प्रयत्न आहे, अशा शब्दात शरद पवारांनी केंद्रावर निशाणा साधला. पवारांच्या या टीकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आता प्रत्युत्तर दिलंय. (Atul Bhatkhalkar responds to Sharad Pawar’s criticism)
अनिल देशमुख यांच्या तपासातून काहीच हाती लागणार नाही, असं शरद पवार म्हणाले. पवारांच्या या वक्तव्यावरच भातखळकर यांनी निशाणा साधलाय. ‘जाणते पवार म्हणतायत अनिल देशमुख यांच्या तपासातून काहीच हाती लागलेलं नाही, केवळ त्रास देण्यासाठी कारवाई सुरू आहे. अहो मग, कोलकात्यात कोट्यवधींची उलाढाल असलेली बोगस खाती कुणाच्या मुलांची होती? बारवाल्यांनी दिलेली खंडणी CM फंडासाठी होती का?’ असा सवाल अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.
जाणते पवार म्हणतायत @AnilDeshmukhNCP यांच्या तपासातून काहीच हाती लागलेलं नाही, केवळ त्रास देण्यासाठी कारवाई सुरू आहे.
अहो मग, कोलकात्यात कोट्यवधींची उलाढाल असलेली बोगस खाती कुणाच्या मुलांची होती? बारवाल्यांनी दिलेली खंडणी CM फंडासाठी होती का @PawarSpeaks?
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 25, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या कारवाईवरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय. ‘हे काही नवीन नाही. अनिल देशमुखांच्या आधीही अनेकांबाबत केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर झाला आहे. त्याची आम्हाला चिंता वाटत नाही. तसंच त्याला महत्व देण्याचीही गरज नाही. यापूर्वीही देशमुख यांच्या घरावर छापेमारी करत त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्यात आला. पण त्यात काही हाती लागलं नाही. आताही काही लागणार नाही. त्यामुळे त्याबाबत आम्हाला कसलीच चिंता वाटत नाही’, असं शरद पवार म्हणाले.
‘आमच्यासाठी हे नवं नाही, अनिल देशमुखांच्या कुटुंबीयांवर, त्यांच्या मुलाच्या व्यवसायावर केंद्राने लक्ष ठेवलं होतं. त्यांच्या हाती काही लागलं नाही. त्या नैराश्यातून हा त्रास देण्याचा प्रयत्न आहे. त्याबद्दल यत्किंचितही चिंता नाही, अस शरद पवार म्हणाले. अनिल देशमुखांच्या आधीही अनेकांबाबत केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर झाला आहे. त्याची आम्हाला चिंता वाटत नाही. तसंच त्याला महत्व देण्याचीही गरज नाही असंही पवार म्हणाले. जो विचार आपल्याला मान्य नाही, तो विचार दडपण्याचा प्रयत्न ईडी सारख्या यंत्रणांकडून होत आहे.. हे अनेक राज्यात होत आहे.. केंद्रातील सत्ता यांच्या हातात आल्यानंतर हे घडत आहेत. लोक सुद्धा त्यांची गांभीर्याने नोंद घेत नाहीत, असंही पवार म्हणाले.
संबंधित बातम्या :
अनिल देशमुखांच्या निवासस्थानांवर ईडीची छापेमारी, शरद पवार म्हणतात, आम्हाला यत्किंचितही चिंता नाही!
जबाबदारी कुणाची, केंद्र की राज्य?, मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांचं पहिल्यांदाच भाष्य
Atul Bhatkhalkar responds to Sharad Pawar’s criticism