मुंबई : भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी धुळे महापालिका निवडणुकीच्या निकालावर संशय घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सनसनाटी आरोप केले आहेत. गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने महापालिका निवडणूक मॅनेज केल्याचा आरोप भाजप आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.
भाजप आमदार अनिल गोटे यांचे नेमके आरोप काय?
राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकांचा विजय हा ईव्हीएमचा विजय आहे, भाजपचा नाही, असा सनसनाटी आरोप करुन आमदार अनिल गोटे हे एवढ्यावरच थांबले नाहीत. आमदार गोटे यांनी आरोपांची खैरात सुरुच ठेवली. ते पुढे म्हणाले, “गिरीश महाजन यांनी सगळ्या निवडणुका मॅनेज केल्या. ज्या ज्या ठिकाणी यांच्याकडे जबाबदारी होती, त्या त्या ठिकाणी यांनी पैसा आणि मशिन मॅनेज केल्या. गिरीश महाजन मॅनेड केल्याशिवाय कुठलीही निवडणूक जिंकू शकत नाहीत. महाजनांच्या या सगळ्या कारस्थानाला मुख्यमंत्र्यांची मदत केली. मुख्यमंत्री या सगळ्यात तेवढेच सामील आहेत.”
सगळी यंत्रणा ताब्यात घेतली आहे, तक्रारीची साधी दखल सुद्धा घेतली जात नाही. मशिन टेंपरिंगचे अनेक पुरावे देऊनही कारवाई नाही, अशी खंतही अनिल गोटे यांनी व्यक्त केली.
धुळ्यात अनिल गोटेंचा पराभव, भाजपचा विजय
धुळ्यात पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत भाजपविरोधात बंड पुकारणाऱ्या आमदार अनिल गोटेंच्या लोकसंग्राम पक्षाचा केवळ एकच उमेदवार निवडून आला होता. भाजपने 50 जागांवर आघाडी घेत धुळे महापालिकेत बहुमत मिळवलं. भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्या त्यांच्याच पक्षाला दिलेल्या आव्हानामुळे ही निवडणूक चर्चेचा विषय बनली होती.
अनिल गोटे यांच्या पक्षाचा धुळ्यात फार प्रभाव दिसून आला नाही. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही सपाटून मार खाल्ला आहे. सुरुवातीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर होते. पण नंतर भाजपने मोठी मुसंडी घेत बहुमताचा आकडा गाठला. धुळे महापालिकेत अखेर भाजपने झेंडा फडकवला आहे. या विजयाचं श्रेय मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांच्या मेहनतीला दिलं.