धुळे : “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे वय, अनुभव आणि राजकीय कारकिर्दीसमोर गोपीचंद पडळकर डासाएवढेही नाहीत (Anil Gote slams Gopichand Padalkar). डास मारायला कुणी बंदूक वापरत नाही. एक हिटचा फवारा काफी असतो”, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला (Anil Gote slams Gopichand Padalkar)..
भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर अनिल गोटे यांनी परिपत्रक जारी करत भाजप नेत्यांवर निशाणा साधला. या परिपत्रकात त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सडकून टीका केली.
“पडळकरांचा निषेध करावा एवढे मोठे त्यांचे व्यक्तिमत्व नाही. पण घृणास्पद निश्चितच आहे. त्यांना आमदार होवून जुम्मे-जम्मे आठ दिवस झाले. पडळकर नव्या नवरीचा आनंद उपभोगत आहेत. नवरी रुळल्यावर त्यांना झटके बसतील. त्यावेळेला त्यांच्याबाजूला स्वत:ची सावलीसुद्धा राहणार नाही”, अशी टीका अनिल गोटे यांनी केली.
हेही वाचा : मला बोलायचं आहे, पण आताच नाही, लवकरच सविस्तर बोलेन : शरद पवार
“पडळकरांनी शरद पवारांना कोरोनाची उपमा दिली. यावरुन त्यांची राजकीय पात्रता, मनाची क्षुद्रता आणि विचारांची पातळी लक्षात येते. पडळकरांनी खुलासा करताना ‘मी भावनेच्या भरात बोलून गेलो’, असं म्हटले. तरीसुद्धा याचा अर्थ असा होतो की जे पोटात आहे तेच ओठावर आले”, असं अनिल गोरे पत्रकात म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका
“देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासोबत केलेली धोकेबाजी, विश्वासघात तर जगजाहीर आहे. पण एकही धनगर विधानसभेत घेऊ नये यासाठी केलेले कारस्थाने, डावपेज आणि प्रसंगी विरोधकांना बळ देण्याचे उद्योग मी जाणून आहे. पण मी संतापामध्ये कधीही फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग आहे, असं म्हणणार नाही. वस्तुस्थितीत असली तरी मी बोलणार नाही”, असा घणाघात अनिल गोटे यांनी केला.
“देवेंद्र फडणवीस यांनी धनगरांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी अनेकांच्या पाठीत इतके खंजीर खुपसले की, गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पाठीत खुपसण्यासाठी बाजारात एकही खंजीर शिल्लक ठेवला नाही”, अशी टीका अनिल गोटे यांनी केली.
हेही वाचा : शरद पवारांवर टीका करणाऱ्या पडळकरांना रामदास आठवलेंचा सल्ला