विशाल ठाकूर, टीव्ही 9 मराठी, धुळे : भाजपचे नाराज आमदार अनिल गोटे हे धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहेत. भाजपमधीलच एक गट म्हणजेच स्वाभिमानी भाजप आणि स्वतःचा पक्ष लोकसंग्रामच्या माध्यमातून ते 74 उमेदवार मैदानात उतरवणार आहेत. या गटाकडून (स्वाभिमानी भाजप+लोकसंग्राम) अनिल गोटे यांच्या पत्नी हेमा गोटे या महापौरपदाच्या उमेदवार असतील.
गोटे यांनी स्वाभिमानी भाजप या नावाने स्वतःचा गट आणि त्यांचा पक्ष लोकसंग्राम अशी युती केली आहे. या गटाचं नेतृत्त्व स्वतः गोटे करणार आहेत. भाजपच्याच विरोधात हा गट आहे. अनिल गोटेंची नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूर केली होती, पण गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना उमेदवारी दिल्यामुळे गोटेंनी पुन्हा एकदा भाजपविरोधात बंड पुकारलं आहे.
धुळे महापालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही आणि ही निवडणूक अनिल गोटे यांच्या नेतृत्त्वात लढली जाईल, असं ठरलं होतं. गिरीश महाजन, जयकुमार रावल, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत बैठक यासाठी बैठक झाली होती.
“पक्ष वाढवण्यासाठी गुंडांना घेतल्याचं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे. धुळे भाजप शहर अध्यक्षांच्या यादीत 28 उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. शिवाय एका उमेदवाराने महापालिकेत भ्रष्टाचार केला असे उमेदवार भाजपच्या पक्षाच्या यादीत होते. त्यामुळे भाजपपासून वेगळी निवडणूक लढवत स्वाभिमानी भाजप आणि लोकसंग्रामच्या माध्यमातून 74 उमेदवार निवडणुकीत उतरवणार आहे,” असं गोटेंनी जाहीर केलंय.
अनिल गोटेंनी काही अटींवर राजीनामा मागे घेतल्याचं काल समोर आलं होतं. पक्षामध्ये गुन्हेगारांना प्रवेश द्यायचा नाही आणि धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली लढल्या जाव्यात या दोन अटींवर आपण राजीनामा मागे घेतल्याचं भाजप आमदार अनिल गोटे यांनी जाहीर केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुमारे सव्वा तीन तास झालेल्या चर्चेत आपल्या दोन अटी मान्य केल्यामुळे राजीनामा मागे घेतल्याचं अनिल गोटे यांनी सांगितलं. संरक्षणमंत्री सुभाष भामरे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप करत गोटे यांनी राजीनामा दिला होता. पक्षाने दगाफटका केला तर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपमध्ये अंतर्गत बंडाळीने टोक गाठलं आहे. धुळे शहराचे भाजप आमदार अनिल गोटे यांनी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची सभा उधळल्यानंतर, स्वत:च महापौरपदाचे उमेदवार असल्याचं घोषित केलं. त्यानंतर त्यांनी भाजपलाही रामराम करणार असल्याचं जाहीर केलं. शिवाय अनिल गोटे यांनी पत्रक काढून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली. गोटे यांनी भाजपच्या आमदारांना उद्देशून हे पत्र लिहिलं होतं.
सध्या पालिका निवडणुकीसंदर्भात डॉ सुभाष भामरे गटाकडून पक्षात गुंडांना खुलेआम प्रवेश दिला जात असल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला होता.
संबंधित बातम्या :