मुंबई: रमेश लटके (ramesh latke) हे कट्टर शिवसैनिक होते. त्यांनी अनेक शाखांमध्ये काम केलं. शिवसेनेला (shivsena) मोठं योगदान दिलं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात तिकीट देण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (rutuja latke) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. एक महिन्यानंतर त्यांना त्यांचा राजीमाना चुकीच्या पद्धतीने दिल्याचं सांगितल्याचं सांगून त्यांचा राजीनामा नाकारला गेला. त्यामुळे त्यांनी त्यांनी नव्याने राजीनामा दिला. लटके यांना शिंदे गटाकडून मंत्रीपदाची ऑफर देण्यात येत असून त्यांना आपल्याकडे ओढण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केला आहे. या प्रकरणी आम्ही कोर्टात गेल्याचंही त्यांनी सांगितलं.
ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिका आयुक्त आणि राज्य सरकारवर टीका केली. ऋतुजा रमेश लटके यांनी नियमाने राजीनामा दिला. त्यांच्यावर कोणतंही कर्ज नाही. महापालिकेची कोणतीही शिस्तभंगाची कारवाई झालेली नाही. तरीही त्यांचा राजीनामा मंजूर केला नाही. मी तीनदा आयुक्तांना भेटलो. पण त्यांना वरवरची उत्तरे दिली. त्यावरून महापालिका आयुक्तांवर राज्य सरकारवर दबाव असल्याचं स्पष्ट होत असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं.
राजीनामा मंजूर करण्याचा मुद्दा आयुक्तांच्या अधिकारात येत नाही. ऋतुजा लटके क वर्गात येतात. त्यामुळे सहाय्यक आयुक्तांकडे हे प्रकरण येते. मी सहाय्यक आयुक्त मिलिंद सावंत यांना भेटलो. त्यांना राजीनामा मंजुरीबाबत बोललो. पण त्यांनी फायली या टेबलवरून त्या टेबलवर फिरत असल्याचं उत्तर दिल्याचं अनिल परब यांनी सांगितलं.
शिंदे गटाकडून ऋतुजा लटके यांना अनेक अमिषे दाखवण्यात येत आहेत. त्यांना मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. पण ऋतुजा लटके या कट्टर शिवसैनिक आहेत. त्या कुठेही जाणार नाहीत. त्या शिवसेनेतच राहतील. त्यांचा राजीनामा मंजूर झाला तर त्या शिवसेनेकडूनच लढतील, असं त्यांनी सांगितलं.
आम्ही या प्रकरणी कोर्टात दाद मागितली आहे. कोर्टात दुपारी या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे, असं त्यांनी सांगितलं. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर झाला नाही तर दुसरा प्लॅन काय? असा सवाल केला असता आम्ही संपूर्ण तयारी केली आहे. शिवसेनाच ही जागा लढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
ऋतुजा लटके यांचा राजीनामा चुकीचा असेल तर तो नाकारला का जात नाही? तो एकतर नाकारला जावा किंवा स्वीकारला जावा. या प्रकरणी आम्ही आयुक्तांकडून लेखी माहिती मागितली. पण त्यांनी लेखी काहीही दिलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.