मुंबई : काँग्रेस पक्षाच्या अडचणी कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. काँग्रेस नेतृत्वा समोरची आव्हानं वाढत आहेत. कारण अनेक मोठे नेते पक्षाला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. काँग्रेसचा आणखी एक मोठा नेता पक्षापासून दूर जाताना दिसत आहे. आपल्याच पक्षातील नेत्याच्या विरोधात या नेत्याने आता दंड थोपटले आहेत. काँग्रेस हायकमांडचा आदेश झुगारुन सचिन पायलट जयपूरमध्ये उपोषणाला बसले आहेत. सचिन पायलट यांनी आता माघार घेणार नसल्याची भूमिका घेतलेली दिसत आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांड आता काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
सचिन पायलट जयपूरमधील ‘शहीद स्मारक स्थळ’ येथे उपोषणाला बसले आहेत. मागे महात्मा गांधींचा फोटो असलेला मोठा बॅनर आहे. पोस्टर व्यतिरिक्त खाली दोन महापुरुषांचे फोटो देखील लावण्यात आले आहेत, त्यापैकी एक महात्मा गांधींचा आणि दुसरा ज्योतीबा फुलेंचा आहे. दोन्ही महापुरुषांचे चित्र नुसते लावलेले नाही, तर त्याला राजकीय महत्त्वही आहे.
गांधींच्या माध्यमातून भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचा संदेश असेल, तर फुलेंच्या माध्यमातून राजकीय समीकरण जुळवण्याचा डाव मानला जात आहे. ज्योतीबा फुले यांनी दलित-शोषित-मागासांच्या हक्कांसाठी सामाजिक न्यायासाठी लढा दिला. सचिन पायलट हे देखील दलित, मागास आणि आदिवासी समाजाच्या मदतीने पुढे जाण्याची तयारी करत आहेत.
पोस्टरमध्ये गांधी घराण्यातील कोणत्याही नेत्याचे किंवा पंडित जवाहरलाल नेहरूंचा देखील फोटो नाही. पोस्टरमध्ये सोनिया गांधींपासून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कोणालाच स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे आता पुढे काय होणार याचीच चर्चा रंगली आहे. ‘मूक उपोषणा’त पायलट सरकारविरोधात बोलणार नाही. अशा प्रकारे ते उपोषणाला बसूनच संदेश देत आहेत. भाजपच्या वसुंधरा राजे यांच्यावरील आरोपांवर कारवाई न केल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसच्या अशोक गेहलोत सरकारवरचा हल्ला हा या घटनेला वेगळेपणा दाखवतो.
विधानसभा निवडणुकीला अवघे सात महिने उरले आहेत, अशा स्थितीत सचिन पायलट यांनी उपोषणाच्या निमित्ताने आपल्या पक्षासह विरोधकांनाही आपल्या ताकदीची जाणीव करून दिली आहे.
सचिन पायलट ज्या प्रकारे भ्रष्टाचाराच्या बहाण्याने रस्त्यावर उतरून उपोषण करत आहेत. सचिन पायलट काँग्रेसमध्ये राहून आपल्या हक्कांसाठी लढणार की नवा राजकीय पर्याय शोधणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
पायलट यांच्यासमोर पहिला पर्याय म्हणजे काँग्रेसमध्ये असताना आपल्या हक्कांसाठी लढणे, कारण ते काँग्रेसमध्ये असताना अधिक ताकदवान आहेत आणि पक्षात असल्याने गेहलोतविरोधी छावणीही कुठेतरी त्यांच्या पाठीशी उभी आहे. सचिन पायलट यांनी दिल्लीपासून जयपूरपर्यंत सर्वांना आपल्या ताकदीची अनुभूती दिली आहे आणि पक्षाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर पुढे जाण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा दबावाच्या राजकारणाचा ट्रेलरही दाखवून दिला आहे.
सचिन पायलट यांची सुरुवातीपासूनच राजकीय महत्त्वाकांक्षा होती की, त्यांना राज्याचे मुख्यमंत्री करावे, पण अशोक गेहलोत पक्षात असताना ते शक्य झाले नाही. काँग्रेस गेहलोतमध्ये वर्तमान पाहत आहे तर भविष्य पायलटमध्ये आहे. अशा स्थितीत काँग्रेस दोन्ही नेत्यांना शांत ठेवत असली तरी पायलट यांचा संयम सुटत आहे. सचिन पायलट लढाईच्या मूडमध्ये आहे. अशोक गेहलोत यांच्या विरोधात पायलट ज्या प्रकारे उपोषणाला बसले आहेत, त्यावरून ते जास्त वेळ थांबण्याच्या मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट होते. सचिन पायलट यांना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होऊ देणार नाही, असा निर्धार गेहलोत यांनी केला आहे. अशा परिस्थितीत सचिन पायलट यांना काँग्रेसपासून फारकत घेण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही.
सचिन पायलट यांनी काँग्रेस सोडल्यास ते आपला नवा राजकीय पक्ष काढतील काढू शकतात. कारण राजस्थानच्या राजकारणात त्यांचा स्वत:चा राजकीय आलेख आहे. जयपूर, दौसा, टोंक, अजमेर, ढोलपूर, करौली, सवाईमाधोपूर, झुंझुनू या भागांची स्वतःची राजकीय पकड मानली जाते. हा गुर्जर पट्टा असून पायलट देखील याच समाजातून येतात. राज्यात आजवर एकाही गुज्जरला मुख्यमंत्री बनवता आलेले नाही. सचिन पायलट यांचे वडील राजेश पायलट हे देखील एक दिग्गज नेते होते आणि गुज्जर समाजात त्यांची स्वतःची पकड आहे. अशा परिस्थितीत पायलट नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या पर्यायावर पुढे जाऊ शकतात.
सचिन पायलट यांनी काँग्रेस सोडली तर त्यांच्यापुढे आप, भाजप आणि बसला असे तीन पर्याय देखील आहेत. मुख्यमंत्री होण्यासाठी ते आम आदमी पक्षात जावू शकतात. भाजपमध्ये गेले तर त्यांचे माजी सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया, आरपीएन सिंग आणि जितिन प्रसाद हे त्यांचं भाजपमध्ये स्थान आणखी मजबूत करु शकतात. पायलट यांच्यासाठी भाजप हा मजबूत राजकीय आधार बनू शकतो, परंतु भाजपमध्ये त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल की नाही हे सांगणे कठीण आहे, कारण पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी अनेक प्रबळ दावेदार आहेत. अशा स्थितीत भाजपसोबत जाण्याच्या दिशेने किती पावले टाकली जातील, याची शक्यता फारच कमी आहे.
राजस्थानच्या राजकारणात बहुजन समाज पक्षाचे स्वतःचे अस्तित्व आहे. बसपाने राज्यात नेहमीच पाच ते सात जागा जिंकल्या आहेत. पण सध्या पक्षाची हवा कमी आहे. पण त्यांना जर दलित समाजाला घेऊन राजकारणात पुढे जायचे असेल तर ते हा पर्याय देखील निवडू शकतात. कारण पायलट यांनी ज्या पद्धतीने ज्योतीबा फुले यांचा फोटो रंगमंचावर लावला आहे, त्याचे राजकीय संकेत बसपकडून मिळतात.
राजस्थानच्या राजकारणात हनुमान बेनिवाल यांचा पक्ष तिसरी शक्ती म्हणून पुढे आला आहे. हनुमान बेनिवाल यांनी उघडपणे सचिन पायलट यांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि आम्ही त्यांच्यासोबत युती करण्यास तयार आहोत, असे म्हटले आहे. अशा परिस्थितीत सचिन पायलट बेनिवाल आणि आम आदमी पार्टीसोबत राजस्थानमध्ये तिसरी आघाडी बनवू शकतात आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पायलट होऊ शकतात. या पर्यायाची राजकीय चर्चा सर्वात जास्त आहे.
आसाम, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये काँग्रेसने अनेक मोठ्या नेत्यांकडे दुलर्क्ष केल्याने पक्षाला मोठा फटका बसला आहे. अनेक नेते पक्ष सोडून भाजपमध्ये गेले आहेत. आता राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार असलं तरी देखील सचिन पायलट जर पक्ष सोडून गेले तर आगामी निवडणुकीत काँग्रेसला मोठा संघर्ष करावा लागणार आहे.