औरंगाबाद : शिवसेनेचे जालन्यातील नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचं बंड अखेर थंड पडलं आहे. औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत अर्जुन खोतकर यांच्याशी चर्चा झाली. या बैठकीनंतर अर्जुन खोतकर यांनी जालन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
औरंगाबादमधील शिवसेना-भाजपच्या मेळाव्यातील भाषणातून अर्जुन खोतकर यांनी माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यामुळे जालन्यात रावसाहेब दानवे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खोतकरांची समजूत काढण्यात यशस्वी ठरले आहेत.
दगाफटका माझ्या स्वभावात नाही. दिलेली जबाबदारी पार पाडेन. आम्ही युतीचा धर्म पाळणारे आहोत. आजपासून युतीच्या कामाला ताकदीनिशी लागणार. – अर्जुन खोतकर
नेमकं प्रकरण काय आहे?
जालना जिल्ह्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा छत्तीसचा आकडा आहे. त्यातच महिन्या-दोन महिन्यांपासून अर्जुन खोतकर लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा आपणच पराभव करणार असल्याचे सांगत होते. किंबहुना, आपणच दानवेंविरोधात लाढणार असल्याचेही खोतकरांनी म्हटले होते. शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते, त्यामुळे खोतकरांच्या बोलण्याला महत्त्व आले होते. मात्र, ऐनवेळी उद्धव ठाकरेंनी अमित शाहांच्या सोबत पत्रकार परिषद घेऊन शिवसेना-भाजप युतीची घोषणा केली आणि अर्जुन खोतकरांना घोषणांना धक्का बसला. मात्र, तरीही अर्जुन खोतकर मागे हटण्यास तयार नव्हते. जालन्यात मैत्रीपूर्ण लढत व्हावी, असे म्हणत अखेरपर्यंत अर्जुन खोतकर लढण्यावर ठाम राहिले. मात्र, अखेर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांचे बंड थंड करण्यात यश आलंय.
VIDEO : खोतकर-दानवे वादाचा लाईव्ह व्हिडीओ
जालना लोकसभा मतदारसंघातील आमदार :
जालना मतदारसंघ : अर्जुन खोतकर, शिवसेना
बदनापूर : नारायण कुचे, भाजप
पैठण : संदिपान भुमरे, शिवसेना
भोकरदन : संतोष दानवे, भाजप
सिल्लोड : अब्दुल सत्तार, काँग्रेस
फुलंब्री : हरीभाऊ बागडे, भाजप