नवी दिल्ली : सैन्याचा राजकीय वापर करु नये अशा आशयाचं पत्र राष्ट्रपतींना लिहिण्यात आलंय. या पत्रात देशातील तब्बल 156 माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश आहे. पण राष्ट्रपती कार्यालयातील सूत्रांच्या मते, असं कोणतंही पत्र प्राप्त झालेलं नाही. तर काही अधिकाऱ्यांनीही आम्ही या पत्रात सही केलेली नसल्याचं स्पष्ट केलंय. दोन माजी अधिकाऱ्यांनी मात्र पत्राला दुजोरा दिलाय.
युद्धभूमीपासून ते देशातील विविध ठिकाणी आम्ही आमचं कर्तव्य बजावलं आहे. मात्र, कर्तव्य बजावत असताना कधीही भेदभाव केला नाही, असे माजी लष्करी अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. 3 जनरल, 4 अॅडमिरल, 11 लेफ्टनंट जनरल, 3 व्हॉईस अॅडमिरल, 15 मेजर जनरल यांसह इतर माजी लष्करी अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन राष्ट्रपतींना हे पत्र लिहिल्याचा दावा केला जातोय.
“राष्ट्रपती हे लष्कराचे सुप्रीम कमांडर असतात. आम्ही नेहमीच राष्ट्रपतींच्या आदेशाचं पालन करतो. तुम्हाला माहितंच आहे की, सैन्यात असताना कुठलाही सैनिक सार्वजनिकरित्या व्यक्त होत नाही. कारण सैनिक सैन्याचे प्रत्येक नियम पाळत असतात. आम्ही माजी सैनिक नेहमीच सैन्याबाबत विचार करत असतो आणि त्यांच्या मुद्द्यांवर बोलत असतो. त्यामुळेच आपल्याला हे पत्र लिहिले आहे.”, असं या पत्रात म्हटलंय.
General SF Rodrigues who is mentioned as the first signatory in the purported letter (in pic- first page of the letter) written by armed forces veterans to President, denies signing it. pic.twitter.com/oidGb8ex0Z
— ANI (@ANI) April 12, 2019
काय आहे सत्य?
माजी एअर चिफ मार्शल निर्मल चंद्र सुरी आणि निवृ्त चिफ मार्शल जनरल एसएफ रोडरिजस यांनी आपण हे पत्र लिहिल्याचा दावा फेटाळलाय. पण मेजर जनरल सुनील वोंबाटकेरे यांच्या मते, पत्र लिहिण्यासाठी ज्यांची परवानगी घेतली होती, त्या सर्वांची परवानगी माझ्याकडे ई-मेलवर आहे. त्यांनी हा त्यांचं म्हणणं का बदललं माहित नाही, असं ते एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.
पत्रात योगी आदित्यनाथांचा उल्लेख
या पत्रात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे. योगी आदित्यनाथ यांनी सैनिकांना ‘मोदी की सेना’ म्हटलं होतं. गाजियाबादमध्ये प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथ यांनी सैनिकांना ‘मोदी की सेना’ म्हटलं होतं.
सैन्याच्या कारवाईचा राजकीय वापर होत असल्याची खंत व्यक्त करणारं पत्र ज्या माजी लष्करी अधिकाऱ्यांनी लिहिले, त्यात जनरल एसएफ रॉड्रीग्ज, जनरल शंकर रॉय चौधरी, जनरल दीपक कपूर, अॅडमिरल लक्ष्मीनारायण रामदास, अॅडमिरल विष्णू भागवत, अॅडमिरल अरुण प्रकाश, अॅडमिरल सुरेश मेहता यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.