दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना एक चिठ्ठी लिहिली आहे. केजरीवाल यांनी या चिठ्ठीतून मोहन भागवत यांना काही प्रश्न विचारले आहेत. त्यातील एक महत्त्वाचा प्रश्न मोदी यांच्याबाबतचा आहे. लालकृष्ण अडवाणी यांच्याबाबत जे घडलं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत का घडत नाहीये? मोदींना तो नियम लागू होत नाही का? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. त्यावर भागवत आता काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिलं आहे. लालकृष्ण अडवाणी 75 व्या वर्षी निवृत्त झाले, त्यांना वयाचा नियम दाखवण्यात आला. तसा हा नियम मोदींना लागू आहे की नाही?, असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. तसेच मोदींनी जून 2023 मध्ये एका नेत्यावर 70 हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला आणि नंतर त्यांच्या सोबतच सरकार बनवलं. याचा आपल्याला त्रास होत नाही का? ईडी, सीबीआयचा उपयोग हा सत्ता मिळवण्यासाठी होतो हे आरएसएसला मान्य आहे का?, असा सवालही केजरीवाल यांनी या चिठ्ठीतून केला आहे.
कोणत्याही प्रकारे ईडी आणि सीबीआयचा वापर करून बेईमानीने सत्ता हस्तगत करणं संघाला मंजूर आहे का? आज प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला आहे. आकाशात तिरंगा अभिमानाने फडकवला गेला पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आता केजरीवाल नव्या भूमिकेत आले आहेत. केजरीवाल जामिनावर आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आतिशी यांच्याकडे दिल्लीची सूत्रे दिली. त्यानंतर आता केजरीवाल हे देशव्यापी दौरा करणार आहेत. पक्षाला मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. तर आतिशी यांच्या रुपाने राज्याला तब्बल 11 वर्षानंतर महिला मुख्यमंत्री मिळाली आहे. त्यामुळे आता दिल्लीवर महिला राज आलं आहे.