राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?; आता अरविंद सावंत म्हणतात…

| Updated on: Jun 02, 2021 | 1:31 PM

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, या प्रश्नावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आकाशाकडे बोट दाखवले. आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही परमेश्वराकडे बोट दाखवले आहे. (arvind sawant reaction on raj thackeray's statement on alliance with shiv sena)

राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?; आता अरविंद सावंत म्हणतात...
अरविंद सावंत, शिवसेना खासदार
Follow us on

हेमंत बिर्जे, टीव्ही9 मराठी, मुंबई: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, या प्रश्नावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आकाशाकडे बोट दाखवले. आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही परमेश्वराकडे बोट दाखवले आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा केवळ मीडियात सुरू आहे. निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतर अशी चर्चा होत असते, असंही अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं. (arvind sawant reaction on raj thackeray’s statement on alliance with shiv sena)

अरविंद सावंत यांनी आज मीडियाशी संवाद साधला. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नावर राज ठाकरे यांनी आकाशाकडे बोट दाखवल्याचं सावंत यांच्या निदर्शनास आणून त्यावर त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर सावंत यांनीही परमेश्वराकडे बोट दाखवले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? हा प्रश्नच मला आशावादी वाटत नाही. त्यांना हा प्रश्न का विचारण्यात आला?. त्यावर राज यांनी का उत्तर दिलं? हे त्यांनाच माहीत. आता यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच बोलू शकतात. तेच यावर निर्णय घेऊ शकतात, असं सांगतानाच समाजकारण आणि राजकारणात काहीही घडू शकतं, असं सावंत यांनी स्पष्ट केलं.

चर्चा नेहमीच होतात

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा नेहमीच होतात. निवडणुकीच्या आधी आणि नंतरही या चर्चा होत असतात. आता मीडिया चर्चा करत आहेत, असं सांगत सगळ्याच गोष्टी भविष्यात बघितल्या जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

त्यांना राऊतांच्या लेखणीचा त्रास होतो

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे. आता ते सामनाचे संपादकही नाहीत, अशी टीका केली होती. त्यावरही सावंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फडणवीसांची ही प्रतिक्रिया गैर आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना संजय राऊत संपादक नव्हते. बाळासाहेब ठाकरे हे ‘सामना’चे संपादक होते. राऊतांच्या लेखणीबद्दल बाळासाहेबांनी त्यांचं नेहमीच कौतुक केलं आहे. राऊत यांच्या लेखणीतून बाळासाहेबांचा विचार आणि संस्कार उतरत असतो. बाळसााहेबांचीच भाषा त्यांच्या लेखणीतून येत असते. त्यामुळे काही लोकांना राऊतांचे मार्मिक बाण टोचतात. त्यामुळे त्यांना त्रास होतो, असा टोला त्यांनी लगावला. विरोधक जे काही बोलत आहेत. नेमकं त्याच्या उलटं घडत असतं. या संदर्भात भाजप नेते नितीन गडकरी यांनी त्यांना काही सल्ला दिला आहे, त्यावर अंतर्मुख होऊन विरोधकांनी विचार केला पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला. (arvind sawant reaction on raj thackeray’s statement on alliance with shiv sena)

 

संबंधित बातम्या:

तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं, उपचार करायचे असतात; संजय राऊतांची चंद्रकांतदादांवर खोचक टीका

पंतप्रधानपदासाठी राज ठाकरे यांची ममता बॅनर्जींना पसंती?; राज नेमकं काय म्हणाले वाचा…

राज-उद्धव एकत्र येतील काय?; आकाशाकडे हात दाखवत राज म्हणाले…

(arvind sawant reaction on raj thackeray’s statement on alliance with shiv sena)