मुंबई: मशालला पंजाने हातात पकडलं आहे. पंजाच्या हातात घडी आहे. त्यामुळे ही मशाल कुणाच्या विचारावर चालते हे सांगायची गरज नाही. पण ही मशाल आपल्याला विझवायची आहे. वरळीच्या समुद्राचंच पाणी आणून ही मशाल विझवायची आहे, असं वक्तव्य भाजपचे (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी केलं होतं. बावनकुळे यांच्या या विधानाचा उद्धव ठाकरे यांच्या गटाचे नेते, खासदार अरविंद सावंत (arvind sawant) यांनी समाचार घेतला आहे. मशालीवर टीका करणारे हे बावनखुळे आहेत. त्यांचा खुळखुळाट आणि खळखळाट फार काळ टिकणार नाही, असा हल्लाबोल अरविंद सावंत यांनी केला आहे.
अरविंद सावंत हे मीडियाशी संवाद साधत होते. उभ्या महाराष्ट्रात विचारांची मशाल पेटली आहे, आचारांची पेटली आहे. राजकीयदृष्ट्या मशाल पेटवणं ठिक आहे. पण ती मनात आहे. त्यामुळे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शस्र हातात घेतील ते मराठी माणसाच्या हातातील शस्त्र आहे. मशाल मनात रुजवली गेली आहे, असं अरविंद सावंत म्हणाले.
कोणीतरी म्हणालं अरबी समुद्राचं आणू आणि मशाल विझवू. ते सुळे आहेत की खुळे आहेत मला माहिती नाही. असे हे बावन’खुळे’ त्यांनी खुळखुळाट करू नये आणि खळखळाट पण करु नका. मशाल अशी विझत नाही रे. अग्नीवर पाणी टाकाल, मनातल्या मशालीवर पाणी कसं टाकाल? असा सवाल त्यांनी केला.
यावेळी त्यांनी मनसेवरही टीका केली. ज्यांना जात प्रांत आठवायला लागलाय, ते मराठी माणसांबद्दल बोलतात, अशी टीका त्यांनी मनसेचं नाव न घेता केली. तसेच मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवरही शंका उपस्थित केली. दोन्ही नवरा बायकोचे जात प्रमाणपत्र बोगस निघाले. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द झालं होतं, खोटी कागदपत्र त्यांनी सादर केली होती. त्यामुळे लोकांना कळतंय खोट्याच्या मागे गोटा उभा आहे, अशी टीका त्यांनी केली.
निवडणुकीच्या तोंडावर यांना मराठी आठवतेय. उद्योग बाहेर जाताना नाही आठवला मराठी माणूस?, असा सवाल त्यांनी केला. उपासमारीत आपला देश 107व्या क्रमांकावर आहोत. काय विश्वगुरु आहेत. महागाई गगनाला भिडली आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तिकडे यांचं लक्ष नाही, अशी टीका त्यांनी केली.