नवी दिल्ली : शिवसेनेतील (Shivsena) उभ्या फुटीची धूळ खाली बसते ना बसते तोच पुन्हा राज्याच्या राजकारणात भूकंप आला. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दोन महिन्यांपूर्वीच राज्यातील भूकंपाचे केंद्र राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) असेल हे स्पष्ट केले होते. त्यांचं राजकीय भाकीत खरं ठरलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. दिग्गज नेत्यांसह अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आंबेडकरांचं भाकीत खरं ठरलं. त्यांनी राज्यात दोन राजकीय बॉम्ब पडणार असल्याचे सांगितले होते. त्यातील पहिला चित्रपट आता सध्या उभा महाराष्ट्रच नाही तर देश पाहत आहे. आता दुसरा राजकीय बॉम्ब कोणता असेल, यावर राजकीय पंडितांचा काथ्याकूट सुरु आहे.
हे केले होते भाकीत
प्रकाश आंबेडकर यांनी दोन वेळा राज्यातील राजकीय परिस्थितीविषयी भूमिका मांडली. त्यावेळी एकच काहूर माजले होते. अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या वक्तव्यावर थेट प्रतिक्रिया न देता ओघवते मत व्यक्त केले होते. एप्रिल महिन्यात प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात पुन्हा राजकीय भूकंप येईल आणि त्याचे केंद्र बिंदू राष्ट्रवादी काँग्रेस असेल असे भाकीत केले होते. त्यानंतर मे महिन्यात त्यांनी राज्यातील सत्तासंघर्षात आणखी दोन भूकंप होतील असे भाकित केले होते. राष्ट्रवादीत बॉम्ब पडेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता.
दुसरा राजकीय बॉम्ब कोणता
प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरेच काही घडायचं बाकी आहे, असा दावा केला होता. अजून दोन राजकीय बॉम्ब फुटायचे बाकी आहे. हे दोन राजकीय बॉम्ब फुटल्यानंतरच महाराष्ट्रातील राजकारण स्थिर होईल, असा दावा त्यांनी केला होता. अर्थातच या दाव्यानंतर राजकीय गोटात एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी काहींनी हे केवळ राजकीय विधान असल्याचा टोला लगावला होता. पण आता याच मंडळींना राज्यातील दुसरा राजकीय भूकंप कोणता असू शकतो, यावर मंथन करण्याची वेळ आली आहे.
खरंच आहे की काय
अर्थात राष्ट्रवादीतील घडामोडी कोणापासून लपलेल्या नाहीत. शरद पवार यांचं तडकाफडकी अध्यक्ष पदावरुन राजीनामा देणं, नाटकीय घडामोडीनंतर अध्यक्ष पद स्वीकारणं. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करुन पक्षासाठी काम करण्याची केलेली मागणी, यामधून आलबेल नसल्याचे संकेत मिळत होते. पण सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की, अजित पवार नाराज आहेत, हे सर्वांना माहिती होते. पण देवेंद्र फडणवीस यांचा यॉर्कर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना खरंच कळला नसेल का?