औरंगाबाद : मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटमही दिलाय. इतकंच नाही तर सरकारने मशिदींवरील भोंगे हटवले नाहीत तर त्यासमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याचे आदेशच त्यांनी दिले आहेत. त्यानंतर आता रविवारी राज ठाकरे यांची औरंगाबादेत जाहीर सभा होत आहे. महत्वाची बाब म्हणजे राज ठाकरे रविवारच्या सभेसाठी आज औरंगाबादेत दाखल झाले आहेत. त्याचवेळी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) हे देखील खासदार इम्तियाज जलील यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत सहभागी झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना ओवैसींनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय.
संपूर्ण देशात अल्पसंख्याक समाज मुसलमानांबाबत भाजपकडून जो द्वेष पसरवला जातोय, त्याचं हे प्रमोशन आहे. त्यामुळे आम्ही पाहतोय की जिथे जिथे भाजपचं सरकार आहे तिथे कायद्याचं राज्य नाही तर बुलडोझरचं राज्य आहे. कारण तिथे भाजपला मतदान, पोलीस, प्रशासनावर भरोसा नाही. त्यामुळे मुस्लिम समाजाला कलेक्टिव्ह शिक्षा दिली जात आहे. जे की देशासाठी, संविधानासाठी, न्यायव्यवस्थेसाठी चुकीचं आहे.
दोन भावांचं भांडण आहे हे. आमचं म्हणणं इतकंच आहे की कायदा-सुव्यवस्था बिघडू नये. शांतता कायम राखण्याचं जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची, पोलिसांची, आमची आणि जनतेची आहे. पण प्राथमिक जबाबदारी ही सरकारची आहे. त्यांनी शांतता कायम ठेवावी. परवानगी द्यावी न द्यावी हा त्यांचा अधिकार आहे, पण त्यामुळे त्यांनी कायदा-सुव्यवस्थाही राखली पाहिजे, असं ओवैसी म्हणाले.
शहराच्या मध्यभागी सभेला परवानगी द्यायला नको होती. अन्य जागांचाही प्रस्ताव आला होता. मात्र, मुद्दाम गृहमंत्रालय आणि राष्ट्रवादीकडून वरुन आदेश आला की मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचीच जागा सभेसाठी दिली जावी. शहरात रमजान ईदचं वातारवण आहे. बाजारात मुले, महिला खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. दोन वर्षानंतर लोक बाहेर पडले आहेत. दुकानदारांनी सामान भरुन ठेवलं आहे. त्यामुळे कुठेतरी शहराचं वातावरण खराब होईल याची काळजी सरकारला नाही, असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय.
कुणाच्यात हिंमत नाही की आम्हाला पंचिंग बॅग बनवेल. आम्ही माणूस आहोत, भारताचे नागरिक आहोत. जर कुणाला वाटत असेल की मुस्लिम पंचिग बॅग आहेत तर त्यांची समज चुकीची आहे. आम्हाला असं वाटतं की देशातील राजकारणात हिंदुत्वाचा रखवाला कोण हे दाखवण्याची स्पर्धा सुरु आहेत. मग त्यात काँग्रेस रेसमध्ये आहे, भाजप, शिवसेना, आप, एनसीपी, समाजवादी पार्टी आहे. तर ही एकप्रकारची स्पर्धा सुरु आहे, अशी खोचक टीका ओवैसी यांनी केलीय.