मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांचं हाडवैर आहे, हे सर्वश्रुत आहेत. मात्र, देशाचा प्रश्न आला की, असदुद्दीन ओवेसी आक्रमकपणे बाजू मांडतात, हे अनेकदा समोर आलंय. असाच प्रसंग पुन्हा एकदा घडला आहे. यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनाच सडेतोड उत्तर दिले आहे. ओवेसी यांच्या उत्तराची राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
इम्रान खान काय म्हणाले होते?
पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या सरकारच्या 100 दिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आले होते. त्यांनी नसीरुद्दीन शाह यांच्यावरुन भारतात सुरु झालेल्या वादाचा दाखल देत, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
“नरेंद्र मोदींना आम्ही दाखवून देऊ की, अल्पसंख्यांकांचे संरक्षण कसे करतात, त्यांच्याशी कसे वागतात. अल्पसंख्यांकांचे हक्क जपण्यासाठी आम्ही पावलं उचलत आहोत. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचेही हेच स्वप्न होते. आम्ही ‘नवीन पाकिस्तान’ बनवत आहोत, जिथे प्रत्येक अल्पसंख्याकांनाही सुरक्षित वाटेल.”, असे इम्रान खान पंजाब प्रांतातील सभेत बोलले.
ओवेसींचं सडेतोड उत्तर
इम्रान खान यांच्यासंबंधी बातमी हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राने प्रकाशित केली. या बातमीला ट्विटरवर कोट करुन, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “पाकिस्तानच्या घटनेनुसार, फक्त मुस्लीम व्यक्तीच पाकिस्तानचा राष्ट्रपती बनू शकतो. मात्र, भारतात विविध समाजातील व्यक्त राष्ट्रपती बनले आहेत, बनू शकतात. त्यामुळे इम्रान खान साहेब, तुम्ही खरंतर आमच्याकडून शिकायला हवं की, सर्वसमावेशक राजकारण कसं करतात आणि अल्पसंख्यांकांच्या हक्कांचं संरक्षण कसं करतात.”
According to the Pakistani Constitution, only a Muslim is qualified to be President. India has seen multiple Presidents from oppressed communities. It’s high time Khan sahab learns something from us about inclusive politics & minority rights.https://t.co/qarmZkqdhH
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) December 23, 2018
नसीरुद्दीन शाह यांनी काय म्हटले होते?
“समाजात विष पसरलंय. माझ्या मुलाच्या सुरक्षेची चिंता वाटते. कायदा हातात घेण्याची खुली सूट मिळाली आहे. मला धर्माचं शिक्षण मिळालं होतं. पण तिला (पत्नी) धर्माचं शिक्षण मिळालेलं नाही. कारण, ती लिबरल कुटुंबातून आहे. मी माझ्या मुलांना धर्माविषयी शिकवलं नाही. चांगलं आणि वाईट याचा धर्माशी संबंध नाही. पण मुलांची चिंता वाटते, की त्यांना कधी जमावाने घेरलं आणि विचारलं की तुम्ही हिंदू आहात की मुस्लीम? तर त्यांच्याकडे काहीही उत्तर नसेल”, असं नसीरुद्दीन शाह म्हणाले.