नागपूर : विकास निधी वाटपात शिवसेनेच्या आमदारांना (Shivsena) डावललं जातंय, शिवसेना आमदारांना डावलून त्यांच्या मतदार संघात विकासकांना निधी दिला जातोय, अशी तक्रार शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. मुख्यमंत्र्यांनी (Cm Uddhav Thackeray) अशा कामांना स्थगिती दिलीय. निधी वाटपाबाबत होत असलेला अन्यायाचा लेखाजोगा तयार करण्याचे काम समन्वयक म्हणून आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांच्याकडे दिले आहे. आशिष जयस्वाल यांनी ‘आम्ही आमदार आहोत म्हणून तुम्ही मंत्री आहात, आम्ही मंत्र्यांची दादागिरी सहन करणार नाही, विकास निधीचे समान वाटप झाले पाहिजे, आम्हाला डावलने आम्ही सहन करणार नाही’ असं म्हटलंय. महाविकास आघाडीतील नेत्याची निधीवरून अशी खदखद बाहेर येण्याची ही पहिली वेळ नाहीये. आधीही अनेक नेत्यांनी अशा तक्रारी केल्या आहेत.
आता शिवसेनेच्या आमदारांनी जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली असली तरी याआधीही काँग्रेसच्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी अनेकदा पक्षाच्या नेतृत्वाकडे याबाबत तक्रारी केल्या आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच मंत्री केसी पाडवी हेही त्यांच्या खात्याला मिळणाऱ्या निधीवरून नाराज होते. त्यांनी त्यांची नाराजी उघडपणे पक्षश्रेष्ठींकडे मांडली होती. त्यांच्या खात्याला मिळणारा सर्व पैसा हा कर्मचाऱ्यांच्या पगावार संपतो आणि विकास कामासाठी निधी उतरतच नाही अशी तक्रार त्यांनी काँग्रेस नेतृत्वाकडे केली होती. त्यामुळे निधीवरून महाविकास आघाडी गेल्या काही महिन्यात होणारी धुसफूस वाढली आहे. आता हे प्रकरण थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेल्याने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता काय भूमिका घेणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाविकास आघाडीत फक्त निधीच्या वाटपावरूनच नाही तर महामंडळाच्या वाटपासूनही अनेकदा धूसफूस झाली आहे. काँग्रेसचाही याबाबत नेहमीच नाराजीचा सूर राहिला आहे. तसेच सर्व निधी हा अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पारड्यात पाडून घेतल्याची टीका फडणवीसांनी अधिवेशनादरम्यान विधानसभेत केली होती. त्यांनी राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेला निधी आणि इतर पक्षांच्या वाट्याला आलेला निघी विधानसभेत वाचून दाखवला होता. त्यावरही बऱ्याच राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सध्या अर्थ खातं हे अजित पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना जास्त निधी मिळतो आणि इतर नेत्यांच्या बाबतीत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप सुरूवातीपासून होत आहे. आता आशिष जयस्वाल यांच्या तक्रारीनंतर हाच वाद पुन्हा उफाळून आला आहे.