मुंबई: मंत्र्यांच्या खाते वाटपानंतर निधी वाटपात झालेल्या दुजाभावावरून शिंदे गटात अस्वस्थता पसरली होती. भाजपच्या (bjp) मंत्र्यांना सर्वाधिक निधी मिळाल्याने शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री नाराज झाले होते. मीडियात त्याची चर्चाही झाली होती. तर, या मुद्द्यावरून विरोधकांनी शिंदे गटाच्या आमदारांना चांगलेच डिवचले होते. शिवसेनेनेही (shivsena) हा मुद्दा उचलून धरून शिंदे गटाच्या आमदारांवर जोरदार टीका केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे. शिंदे गट आणि भाजपमधील समन्वयासाठी आशिष कुलकर्णी (ashish kulkarni) यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही गटातील आमदार आणि मंत्र्यांमध्ये सुसंवाद ठेवण्याचं आणि शिंदे गटातील आमदारांच्या समस्या सोडवण्याचं काम कुलकर्णी यांच्याकडे असेल, असं सूत्रांनी सांगितलं.
राज्यसभा निवडणुकीच्यावेळी भाजपचा उमेदवार निवडून आणण्यामागे कुलकर्णी यांचा मोठा हात असल्याचं सांगितलं जातं. राज्यसभा निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्यांची एक टास्क फोर्स नेमली होती. त्यात कुलकर्णी यांचा समावेश होता. या शिवाय या फोर्समध्ये गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रसाद लाड यांचा समावेश होता.
भाजप आणि शिंदे गटात वाद टाळून सुसंवाद-सुसूत्रता राहावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशिष कुलकर्णी यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत भाजपची रणनिती आखण्यात आशिष कुलकर्णी यांनी महत्वाची भूमिका वठवली होती. महाराष्ट्रातील सत्तांतरासाठी गुप्त हालचाली झाल्या होत्या. त्यावेळी आशिष कुलकर्णी हे पडद्यामागचे सूत्रधार होते.
आधी शिवसेना, नंतर काँग्रेस आणि आता भाजप असा आशिष कुलकर्णी यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. शिवसेनेत असताना ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे होते. काँग्रेसमध्ये असताना राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि पक्षाच्या थिंकटॅंकमध्ये आशिष कुलकर्णी यांचा समावेश होता. कुलकर्णी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. कुलकर्णी सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.