मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 13 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी केली. राफेल आणि पुलवामा हल्ल्यावरुन राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आता भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार सुरु झाला आहे.
मुंबईत भाजपकडून महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे या मेळाव्याला उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.
राज ठाकरेंचं भाषण म्हणजे टाईमपास : आशिष शेलार
“देवेंद्र फडणवीस राज्यातले विषय बोलतील, तर सुषमा स्वराज केंद्रातले विषय बोलतील. पण मी ठरवलंय, मी गल्लीतल्या लोकांवर बोलेन. राज ठाकरे यांचे कालचे भाषण म्हणजे नुसता टाईमपास. काल टाईमपास झाला, आज आपण सिरियस काम करु.” असे म्हणत आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाची खिल्ली उडवली.
“कोण कुणावर काय बोलतो, आपण जे बोलतो ते लोकांना पचेल तरी काय याचे भान नाही. यांना ठाणे-मुंबईच्या वादात बोलवलं जात नाही आणि हे भरत-पाक सीमेवर बोलतात. मोदीवर बोलण्याची तुमची औकात नाही. तेव्हाही मोदींच्या मागे लपून मते घेतली. तुमच्या टीकेला भीक घालत नाही.”, असा घणाघातही आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर केला.
तसेच, “अशोक चव्हाण म्हणाले आम्ही जागा देणार नाही तेव्हा राष्ट्रवादीचे फोन दादरला फोन लावतात. मग काय पोपट सुरु होतो. फक्त एक जागा मिळवण्यासाठी तुम्ही जवानाच्या कर्तृत्वावर प्रश्न उपस्थित करतात. लोकसभेच्या रिगणात याला तेव्हा पुढच्या गोष्टी बोलू.”, असेही आशिष शेलार हे राज ठाकरेंना उद्देशून म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज ठाकरेंना पोपटाची उपमा
“राज ठाकरे हे कलाकार आहेत. त्यामुळे त्यांचे काम हे दिलेली स्क्रिप्ट ही वाचणे एवढच आहे. बारामतीला पोपटाची कमी पडली की ते नवीन पोपट शोधतात. राज ठाकरे यांच्या पक्षात 12 वा गडी आणि कॅप्टन देखील नाही. त्यांना आता जे सुपारी देतील त्यामुळे ते बोलत राहतील यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही.” अशी जहरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.