मुंबईः सीमाप्रश्नी भाजपने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही असा प्रश्न विचारणाऱ्या शिवसेना आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी जहरी सवाल केलाय. महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra Karnataka) सीमाप्रश्नावर भाजपने पहिल्याच दिवशी भूमिका स्पष्ट केलेली आहे. तरीही ती कळली नसेल तर पेंग्विनने भांग घेतली होती का, असा प्रश्न त्यांनी विचारलाय.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बेळगाव तसेच महाराष्ट्रातील इतर गावांबाबत सातत्याने वक्तव्य करत असताना महाराष्ट्र सरकार शांत का बसलंय? केंद्रात भाजप सरकार असूनही महाराष्ट्रातील शिंदे-भाजप महायुतीचं सरकार मूग गिळून का बसलंय, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात येतोय. त्याला आज मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं.
आशिष शेलार म्हणाले, ‘ आदित्य ठाकरे सामना सोडून काही वाचत नसतील किंवा बाकीची भाषा त्यांना कळत नसेल.. देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच दिवशी भूमिका स्पष्ट केली होती. कर्नाटकने हे सगळं प्रकरण शांततेने आणि संयमाने घेतलं पाहिजे. अन्यथा आरेला कारेचं उत्तर मिळेल.
आमचा दावा ज्या गावांवर आहे, तो 100% सर्वोच्च न्यायालयात देखील मांडला आहे, पुढे नेला आहे. त्या ठिकाणाहून जी वक्तव्य झाली त्या संदर्भात स्वतः अमित शहा देखील बोलले आहेत. तरीही अशी वक्तव्ये होत असल्याचं आशिष शेलार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. त्यामुळे अनिल देशमुख लवकरच जेलमधून बाहेर येण्याची शक्यता आहे. आशिष शेलार यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, अनिल देशमुख यांनी केलेला गुन्हा भयंकर आहे. गृहमंत्री असताना वाजेसारखे अधिकारी यांना वापरून दर महिन्याला काहीतरी मिळाले पाहिजे शंभर कोटीपर्यंत मिळाले पाहिजेत, असा धंदा केला. त्यामुळेच ते जेलमध्ये आहेत….
न्यायालय प्रक्रियेमध्ये मी भाष्य करणार नाही. पण बाहेर आल्यावर त्यांचे परत असेच धंदे सुरू होतील की काय अशी भीती मुंबई आणि राज्याच्या नागरिकांमध्ये आहे.