बीड : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर दोनच दिवसात फडणवीस जळगावात एकनाथ खडसेंच्या घरी चहापानासाठी गेले. फडणवीसांच्या या दोन भेटीवरुन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीगाठींवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याला बीड दौऱ्यावर असलेले भाजप आमदार आशिष शेलार यांनी खोचक उत्तर दिलं आहे. शेलार आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केलं. (Ashish Shelar’s reply to Sanjay Raut’s statement on Fadnavis and Pawar meet)
फडणवीस आधी ‘सिल्वर ओक’वर गेले, त्यानंतर ते खडसेंच्या घरी गेले. आता ते मातोश्रीवरही येतील असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता शेलार यांनी खोचक उत्तर दिलं. ‘मी सुद्धा संजय राऊतांचं ते वाक्य ऐकलंय, आजच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं वाक्य म्हणजे आमंत्रणाचा एक प्रकार आहे. आमंत्रण स्वीकारलं आम्ही’, असं आशिष शेलार म्हणाले.
मराठा आरक्षणाबाबत समाजाची भावना तीव्र आहे. महाविकास आघाडीने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाचा एकप्रकारे कोल्ड ब्लडेड मर्डर केल्याची घणाघाती टीकाही शेलार यांनी केलीय. आज गळे काढणारे त्यावेळी आरक्षण नाकारत होते. आता भाजपला शिकवण्याचा प्रयत्न केला जातोय. नाकाने कांदे सोलू नका. आम्हाला संपूर्ण आरक्षण पाहिजे. मराठा आरक्षण लढ्याला भाजपचा पूर्ण पाठिंबा देत आहोत, अशी घोषणा शेलार यांनी यावेळी केली. तसंच मराठा समाजाची टिंगल टवाळी करण्याचं काम शिवसेनेनं केलंय. मराठा समाजाला 3 हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज द्या, अशी मागणीही त्यांनी केलीय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 5 जून रोजी बीडमध्ये विनायक मेटे यांच्या नेतृत्वात मोर्चा होत आहे. या मोर्चाला भाजपचा पाठिंबा आहे, असंही शेलार यांनी स्पष्ट केलंय.
मराठा आरक्षणाबाबत राज्यात निर्माण झालेल्या स्थीती बाबत आज बीड येथे मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधला व याबाबत भाजपाची भूमिका स्पष्ट केली. आमदार अँड लक्ष्मण पवार, नमिता मुंदडा, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र म्हस्के सोबत उपस्थित होते! pic.twitter.com/3VzS2I8xaM
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 2, 2021
दरम्यान, फडणवीस यांनी 31 मे रोजी शरद पवार यांची भेट घेतली होती. पवारांवर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यामुळे प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आपण पवारांना भेटलो. ही एक सदिच्छा भेट होती असं फडणवीस यांनी सांगितलं होतं. तसंच फडणवीस काल जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चहापान केलं. पत्रकारांनी विचारल्यावर रक्षाताई खडसे या भाजपच्या खासदार आहेत. आमच्या खासदारांनी निमंत्रण दिल्यानंतर मी त्यांच्या घरी चहासाठी गेलो. याचा कुणीही वेगळा राजकीय अर्थ काढू नये, असं फडणवीस म्हणाले.
संबंधित बातम्या :
‘…तर ते पवारांना ओळखतच नाहीत’, फडणवीस-पवार भेटीवर राऊतांचा रोखठोक अग्रलेख
डॅमेज कंट्रोलची गरज ठाकरे सरकारला आहे, भाजपला नाही, फडणविसांचा टोला
Ashish Shelar’s reply to Sanjay Raut’s statement on Fadnavis and Pawar meet