गुवाहाटी (आसाम) : “निवडणुकीच्या तोंडावर वाट्टेल ती आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा भारतीय जनता पक्षाचा नेहमीचाच उद्योग आहे. आश्वासने काँग्रेस पक्षही देते. पण काँग्रेस आणि भाजपच्या आश्वासनांमध्ये हमी आणि जुमल्यांइतका फरक आहे”, असं काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले (Ashok Chavan slams BJP).
अशोक चव्हाण आसाम दौऱ्यावर
आगामी आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण आसाम दौऱ्यावर गेले आहेत. तिथे आसाम विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज आसाम प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या राजीव भवन येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि आसमाचे सहप्रभारी पृथ्वीराज साठे, राष्ट्रीय प्रवक्ते प्रो. गौरव वल्लभ, वाशिम जिल्ह्यातील काँग्रेस आमदार अमित झनक, आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाच्या प्रमुख बबिता शर्मा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले?
“काँग्रेस पक्षाने नेहमीच सर्वसामान्यांच्या अपेक्षा जाणून निर्णय घेतले आहेत. केंद्रातील युपीएचे सरकार असो वा विविध राज्यातील काँग्रेसची सरकारे असो, त्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचे पालन केले आहे. आसामच्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाच प्रमुख आश्वासने दिली आहेत. ती केवळ आश्वासने नाहीत; तर हमी आहे. आसाममध्ये निश्चितपणे काँग्रेस आघाडीचे सरकार येणार असून त्यानंतर काँग्रेसने दिलेला शब्द प्रत्यक्षात आलेला असेल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपवर निशाणा
अशोक चव्हाण यांनी यावेळी भाजपवरही सडकून टीका केली. “भारतीय जनता पक्षाकडे ना निती आहे, ना नियोजन आहे. सीएए लागू करण्याबाबत भाजप पश्चिम बंगाल निवडणुकीत आग्रही दिसून येते. पण आसाममध्ये मात्र ते या विषयावर बोलायलाही तयार नाहीत. भाजपची ही भूमिका दुटप्पी आणि दिशाभूल करणारी आहे. काँग्रेसची भूमिका राज्यानुरुप बदलत नाही. आम्ही संपूर्ण देशात सीएए लागू होऊ देणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा राहुल गांधी यांनी दिलाय”, असं चव्हाण म्हणाले (Ashok Chavan slams BJP).
‘भाजपती फोडा आणि झोडा हीच निती’
प्रत्येक निवडणुकीत मतांचे धृवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न असतो. देशातील त्यांची एकही निवडणूक हिंदू-मुसलमान, देशभक्ती आणि पाकिस्तान या मुद्द्यांवर नेल्याशिवाय पूर्ण होत नाही. ‘फोडा आणि झोडा’ हीच भाजपाची एकमेव निती आहे. देशभरात सध्या सुरू असलेल्या पाचही राज्यांच्या निवडणुकीत त्यांची हीच भूमिका दिसून येते. आसाम विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड समर्थन लाभत असून, काँग्रेसचा विजय सुनिश्चित असल्याचा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात असा निष्क्रिय मुख्यमंत्री झाला नाही: नारायण राणे