“आमच्या सर्व जाहिराती निवडणूक आयोगाने रद्द केल्या. त्यांचं काय डोकं चालतं माहीत नाही. पण सोशल मीडिया नावाची गोष्ट असते. आयोग आजही पूर्वीच्या काळापासून चालत आहे” अशी टीका राज ठाकरे यांनी केली. “महाराष्ट्रासारखं औद्योगिक राज्य, या देशात दुसरं नाही. जगातून कोणताही उद्योग येणार असेल तर पहिलं प्राधान्य महाराष्ट्र असते. असलेले उद्योग आणि येऊ घातलेले उद्योग सरकार म्हणून कोणत्या जागा भरायच्या? कोणत्या नोकऱ्या आहेत? कोणत्या स्किलची माणसं हवीत? हे महाराष्ट्रात सांगितलं, तर लोकांना कळेल ना. लोकं अर्ज करतील. पण बाहेरच्या राज्यात कळतं. राज्यातील मुलांना सांगितलं जात नाही. रिक्षा टॅक्सीचे परवाने बाहेरच्या राज्यांतील मुलांना माहीत असतं. पण राज्यात माहीत नसतं. त्यामुळे सरकारने ही गोष्ट आपल्या राज्यातील मुलांकडे पुरवली पाहिजे” असं राज ठाकरे म्हणाले.
“मध्यंतरी मुख्यमंत्री दावोसला गेले. 5 लाख कोटींचे उद्योग येणार असं सांगितलं. त्यांना याबाबत विचारांना, मला का विचारत आहात. 5 लाख कोटींचं काय झालं? हे त्यांना विचारा ना. त्यांना फक्त हा काय बोलला, तो काय बोलला हे विचारून त्यात वेळ घालू नका” असं राज ठाकरे म्हणाले. भाजपशी छुप्या युतीच्या मुद्यावर म्हणाले की, “मी उमेदवार कुठे द्यायचे माझी मर्जी. माझ्या पक्षातील लोकांना विचारून मी निर्णय घेतो. जे तुमच्या मनात असतं ते आमच्या मनात नसतं प्रत्येक वेळेला”
‘….तर सरकारला नफा मिळेल’
“झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील नफा राज्य सरकार का सोडत आहे? राज्य सरकारला मिळणारा नफा बिल्डरच्या घशात का घालत आहोत? झोपू योजना सरकारने केली, पार्टनर कुणालाही करा, पण सरकारने योजना केली तर सरकारला नफा मिळेल. तो बिल्डरांना मिळत आहे. खासगी माणसं कशाला पाहिजे. कोणी का बिल्डर असे ना. मूळात या झोपडपट्ट्या येतात कशा. त्यांना कोण बसवतं. हा धंदा झाला. इथे बसवायच्या. नंतर दुसरीकडे न्यायच्या” असं राज ठाकरे म्हणाले.