Vidhansabha Election Congress Meeting : सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोकसभा निवडणूक, शिक्षक-पदवीधर निवडणूक यापाठोपाठ आता काही महिन्यातच विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात दमदार यश मिळालं होतं. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची मुंबईत उशिरा बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्रातील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची काल रात्री उशिरा मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. नरिमन पॉइंटमधील मित्तल टॉवर या ठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेसचे प्रमुख नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि यशोमती ठाकूर यांच्यासह विश्वजीत कदम, सतेज पाटीलही उपस्थित होते. तसेच या बैठकीला काँग्रेसच्या राज्यातील आमदारांनीही हजेरी लावली. या बैठकीत प्रामुख्याने विधानसभा निवडणुकीबद्दल चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
काँग्रेसच्या या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील मतदार संघानिहाय परिस्थिती जाणून घेतली. लोकसभेला कोणकोणत्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाला यश मिळाले आणि त्याचा फायदा विधानसभेला कशा पद्धतीने होईल यावर सुद्धा विचार मंथन झाले. तसेच महाविकास आघाडी म्हणून लढल्यास काँग्रेसच्या वाटेला कोणत्या जागा फायदेशीर असतील यासंदर्भात सुद्धा या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार अनुपस्थित होते. नाना पटोले हे दिल्ली दौऱ्यावर असल्यामुळे गैरहजर होते. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिळालेल्या यशानंतर सध्या महाराष्ट्र काँग्रेस हे चांगलेच सक्रीय झाले आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या राज्यांनी काँग्रेसला कौल दिला त्यात महाराष्ट्र एक प्रमुख राज्य आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान महाविकास आघाडीमध्ये विधानसभेच्या जागावाटपाचे सूत्र अद्याप ठरलेले नाही.