नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : पाच राज्यांपैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहे. या चार पैकी तीन राज्यांत भाजपचे सरकार बनणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार येणार आहे. तेलंगणात प्रथमच काँग्रेसचे सरकार येणार आहे. २०२२ मधील विधानसभा निवडणुकीत चमत्कार करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाची कामगिरी कशी राहिली? यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या आम आदमी पक्ष दिल्ली आणि पंजाबात सत्तेत आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी धडाकेबाज प्रचार केला. अनेक रॅल्या काढल्या. रोड शो केले. एकूण २०० पेक्षा जास्त जागा ‘आप’ने लढवल्या होत्या. परंतु एकाही ठिकाणी ‘आप’ला यश मिळले नाही.
दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार बनल्यानंतर हिंदी बेल्टमध्ये म्हणजे राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी ‘आप’ने विधानसभा निवडणूक लढवली. मध्य प्रदेशात 70 पेक्षा जास्त ठिकाणी निवडणूक रिंगणात आप उतरली. तसेच राजस्थानमध्ये 88 तर छत्तीसगडमध्ये 57 ठिकाणी ‘आप’ने उमेदवार उभे केले. दिल्ली आणि पंजाबप्रमाणे या राज्यांमध्ये मोफत पाणी आणि वीज देण्याची घोषणा दिली. परंतु एकाही ठिकाणी ‘आप’चा उमेदवार विजयी होऊ शकला नाही.
अनेक ठिकाणी ‘आप’च्या उमेदवारांची अमानत रक्कम जप्त झाली आहे. सिंगरौलीच्या नगराध्यक्ष राणी अग्रवाल आणि टीव्ही कलाकार चाहत पांडे निवडणुकीत पराभूत झाली. ‘आप’ने तेलंगणात उमेदवार उभे केले नाही. पण इतर तीन राज्यांत उमेदवार उभे केले होते. त्यात छत्तीसगडमध्ये 0.97%, मध्यप्रदेशात 0.42% आणि राजस्थानमध्ये 0.37% टक्के मते मिळाली.
5 राज्यांमध्ये ‘आप’ला मिळालेली मतं
गोवा विधानसभा निवडणूक – 6.77 टक्के
पंजाब विधानसभा निवडणूक – 42. 01 टक्के
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक – 0.38 टक्के
उत्तराखंड विधानसभा निवडणूक – 3.32 टक्के
मणिपूर विधानसभा निवडणूक – 0 टक्के