नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : पाच राज्यांपैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झाले. या निवडणूक निकालातून तीन राज्य भाजपने पटकवली. चार राज्यांपैकी 2018 मध्ये एकही राज्य भाजपकडे नव्हते. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार होते. परंतु मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटस राबवून भाजप सत्तेवर आले. 2023 मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. या तिन्ही राज्यांत नवीन मुख्यमंत्री भाजपकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. कोणत्या राज्यांत कोणाची नावे आहेत चर्चेत पाहू या…
मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मुख्यमंत्रीपद होते. परंतु या निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. नरेंद्र मोदी यांच्या नावावर मध्य प्रदेशात निवडणूक लढवली गेली. यामुळे शिवराज चौहान यांच्याशिवाय दुसरे धक्कादायक नाव भाजपकडून पुढे येण्याची शक्यता आहे. त्यात पक्षाचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांचेही नाव आहे. तसेच नरेंद्रसिंह तोमर, प्रहलादसिंह पटेल आणि नरोत्तम मिश्रा यांची नावेही चर्चेत आहे.
राजस्थानमध्ये भाजपने मुख्यमंत्र्यांचा चेहरा जाहीर केला नव्हता. निवडणुकीची सूत्र वसुंधरा राजे यांच्याकडे होती. यामुळे त्यांचे नाव सर्वात पुढे असले तरी खासदार दिया कुमारी, सीपी जोशी, ओम बिर्ला, भूपेंद्र यादव, गजेंद्र सिंह शेखावत आणि बाबा बालकनाथ यांचेही नाव चर्चेत आहेत. बाबा बालकनाथ हे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे नाथ संप्रदायातील आहेत. एक्झिट पोलमध्ये बाबा बालक नाथ यांना चांगली पसंती मिळाली होती.
छत्तीसगडमध्ये भाजप ५६ जागांवर विजय होण्याची शक्यता आहे. छत्तीसगडची निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नावावरच लढवली गेली. या ठिकाणी रमन सिंह यांचा दावा कायम आहे. परंतु भाजपने पुन्हा धक्कातंत्र वापल्यास नवीन नाव पुढे येऊ शकते. त्यात छत्तीसगज भाजप अध्यक्ष अरुण साव, खासदार विजय बघेल, सरोज पांडे, बृजमोहन अग्रवाल, रेणुका सिंह आणि ओपी चौधरी यामधील कोणीही असू शकते.
भाजपकडून मंत्रिमंडळ विस्तार किंवा मुख्यमंत्रीपदासाठी यापूर्वी धक्कातंत्र अवलंबले आहे. गोवा, छत्तीसगड, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, त्रिपुरासह काही राज्यांत नवीन चेहरे यापूर्वी दिलेले आहे. यामुळे मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये नवीन चेहरा मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.