मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केल्यानंतर शिवसेनेत (shivsena) एकच खळबळ उडाली आहे. राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली. राऊत यांच्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरलेली असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी राऊत यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्याचं काम केलं. राऊतांच्या कुटुंबीयांना धीर दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला फटकारेही लगावले. तर, दुसरीकडे राऊत यांना अटक झाल्याचा आनंद झाल्याची प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सकाळी 8 वाजता लागणारा भोंगा आता बंद झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. या सर्व गदारोळात एका ट्विटने मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ते ट्विट होतं भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांचं. सध्या या ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे.
खाकस्पर्श… pic.twitter.com/uBs5qq0qal
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 31, 2022
राऊत यांच्या अटकेनंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एकच वाक्य लिहिलं आहे. ते म्हणजे खाकस्पर्श… या हेडिंग खाली तीन फोटो त्यांनी पोस्ट केले आहेत. या तिन्ही फोटोत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे कॉमन आहेत. पहिल्या फोटोत पवारांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा हात पकडलेला आहे. देशमुख हे सध्या मनी लॉन्ड्रिग प्रकरणात तुरुंगात आहेत. दुसऱ्या फोटोतही पवार आहेत. या फोटोत पवारांनी माजी मंत्री नवाब मलिक यांचा हात पकडला आहे. मलिकही तुरुंगात आहेत. त्यांच्यावरही मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. तिसऱ्या फोटोत पवारांनी संजय राऊत यांचा हात पकडला आहे. राऊतांनाही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तीन दिवसाची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे फोटो पोस्ट करून अतुल भातखळकर यांनी काहीही न बोलता राजकीय भाष्य केलं आहे. तिन्ही फोटोतील नेते तुरुंगात आहेत. तिघांचेही हात पवारांनी पकडले आहेत. आणि या फोटोंना खाकस्पर्श देण्यात आलं आहे. म्हणजे पवारांनी ज्यांचा हात पकडला तो खाक झाला. त्याचं वाटोळं झालं असं भातखळकर यांना सूचवायचं आहे. त्यामुळे आज दिवसभर भातखळकर यांच्या या ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे.