मुंबई: होय, माझे वडील कारसेवक म्हणून अयोध्येला (ayodhya) गेले होते. पण शिवसेना वगैरे असा विषय नव्हता. त्यावेळी प्रखर हिंदुत्व (hindutva) मानणारी सर्व मंडळी अयोध्येला गेली होती. त्यात माझे वडील होते. भाजप, विश्व हिंदू परिषद, शिवसेना आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते होते. पण सर्व हिंदूत्व या भावनेने अयोध्येला गेले होते, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी काल अर्धवट माहिती दिली. पूर्ण स्टोरी सांगितलीच नाही, असा हल्लाबोल करत भाजपचे आमदार अतुल सावे यांनी मुख्यमंत्र्यांचा मुद्दा खोडून काढला. राज्यसभेच्या निवडणुकीमुळे अतुल सावे मुंबईत आहेत. आज भाजपकडून उमा खापरे आणि अपक्ष उमेदवार म्हणून सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी सावेही उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधत शिवसेनेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. त्यामुळे आता शिवसेना काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
होय, माझे वडील मोरेश्वर सावे हे कारसेवक म्हणून आयोध्येला गेले होते. कारसेवकांची एक ट्रेन भरून औरंगाबादहून अयोध्येला गेली होती. त्यात माझे वडीलही होते. त्यावेळी शिवसेना असा विषय नव्हता. प्रखर हिंदुत्व मानणारी सर्व मंडळी अयोध्येला गेली होती. शिवसेना, भाजप, बजरंग दल आणि विहिंपचे कार्यकर्तेही अयोध्येला गेले होते. ते केवळ हिंदुत्वाच्या भावनेतून गेले होते. पण उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत अर्धवट स्टोरी सांगितली. त्यांनी पूर्ण स्टोरी सांगितलीच नाही, असं अतुल सावे यांनी सांगितलं.
माझे वडील शिवसेनेत सातत्याने प्रखर हिंदुत्व मांडत होते. पण शिवसेनेच्या नेत्यांना ते आवडलं नाही. त्यांचं खच्चीकरण केलं गेलं. त्यांना लोकसभेतचं तिकीट दिलं नाही. तुम्हाला माझ्या वडिलांचा आणि हिंदुत्वाचा एवढा अभिमान होता तर त्यांना लोकसभेचं तिकीट का दिलं नाही? लोकांनी त्यांना धर्मवीर म्हटलं होतं, ती पदवी का स्वीकार केली नाही?, असा सवालही त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांची काल अयोध्येत अतिविराट सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. अयोध्येच्या मुद्द्यावरूनही ठाकरे यांनी भाजपला घेरले. मोरेश्वर सावे आमचे महापौर होते. ते कारसेवक बनून अयोध्येला गेले होते. शिवसेना अयोध्या आंदोलनात नव्हती असं कसं म्हणता? असा सवाल करतानाच तुमच्याकडे सावे यांचे चिरंजीव आहेत. ते आमदार आहेत. माझे वडील अयोध्येला गेले नव्हते असा खुलासा हवं तर अतुल सावे यांनी करावा, असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं.